भारतातील या मंदिरात प्रसादा म्हणून वाटले जाते सोने आणि चांदी !
मुंबई, 28 जानेवारी: भारतात देवीदेवतांची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. तेथील विशिष्ट प्रथा, परंपरांमुळे ती विख्यात आहेत. अशा मंदिरांमध्ये आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत असतात. इष्ट देवतेला मनोमन प्रार्थना करून प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक ठिकाणी प्रसादाच्या रूपात लाडू, शिरा असे पदार्थ दिले जातात. परंतु अशीही काही मंदिरे आहेत, जेथील प्रसादाबद्दल ऐकून तुम्हीही चकीत व्हाल.
मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात असे एक अनोखे मंदिर आहे जिथे सोन्या-चांदीच्या रूपात प्रसाद वाटला जातो. होय! तुम्ही ऐकले ते खरे आहे. महालक्ष्मीच्या पूजेनंतर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून सोन्या-चांदीचे दागिने दिले जातात. यासह येथे येणारे लोकही महालक्ष्मीच्या मंदिरात सोने-चांदी इत्यादी अर्पण करतात आणि जीवनात यश मिळवण्यासाठी प्रार्थना करतात. असे मानले जाते की असे केल्याने वर्षाच्या शेवटी त्यांचे उत्पन्न दुप्पट होते.
या अद्भुत मंदिराचे दरवाजे धनत्रयोदशीच्या दिवशी उघडतात
मध्य प्रदेशातील रतलाम येथे असलेले माता महालक्ष्मीचे हे मंदिर धनत्रयोदशीच्या शुभ दिवशीच भक्तांसाठी खुले केले जाते. यानंतर येथे 5 दिवस माता महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते आणि दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असे मानले जाते की जो कोणीही भक्त माता महालक्ष्मीच्या शोभेसाठी घरातून दागिने आणतो, त्याचे उत्पन्न दुप्पट होते आणि घरात सुख-समृद्धी टिकून राहते.
दिवाळीत मंदिराची विशेष सजावट
दिवाळीच्या वेळी मंदिराची सजावट अशा पद्धतीने केली जाते की दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे तोंडही उघडे राहते. येथे संपूर्ण मंदिर नोटा आणि दागिन्यांनी सजले आहे. ज्याची किंमत 100 कोटींवर पोहोचली आहे. मंदिराच्या सजावटीसाठी भाविक एवढा पैसा दान करतात. त्यानंतर ते त्यांनाही परत केले जाते. त्यांना या रकमेची रीतसर पावती दिली जाते आणि भाऊबीजेच्या दिवशी टोकन दिल्यावर पैसे आणि दागिनेही परत केले जातात.
प्रसादात मिठाई नव्हे, सोन्या-चांदीचे दागिने मिळतात
या मंदिराची खास गोष्ट म्हणजे दिवाळी सणात भाविकांना प्रसाद म्हणून दागिने-रोख रक्कम दिली जाते. हा प्रसाद घेण्यासाठी भाविक दूरदूरवरून या मंदिरात गर्दी करतात. मात्र, भाविक येथे मिळालेले दागिने खर्च करत नाहीत तर तिजोरीत ठेवतात. असे केल्याने चौपट प्रगती होते असे मानले जाते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.