Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

‘छोडो-भारत’कडून ‘जोडो-भारत’कडे - मधुकर भावे

‘छोडो-भारत’कडून ‘जोडो-भारत’कडे - मधुकर भावे


उद्या २८ डिसेंबर... बरोबर १३७ वर्षांपूर्वी मुंबईत काँग्रेसची स्थापना याच दिवशी झाली. गोवालिया टँक म्हणजे आजच्या  अॉगस्ट क्रांती मैदानातील तेजपाल बिल्डींगमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्थापन झाला. व्योमेशचंद्र बॅनर्जी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पहिले अध्यक्ष झाले. तिथपासून आजपर्यंत १३७ वर्षांत ८३ अध्यक्षांनी काँग्रेसची पताका फडकवत ठेवली. आजचे अध्यक्ष खरगे यांच्यापर्यंत... लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू या तीन मुख्य खांबांना काँग्रेसची कमान मानली गेली होती. त्यांच्या तोडीस तोड असे चारित्र्यसंपन्न आणि देशभक्त नेते काँग्रेसचे निर्विवाद नेते होते. काँग्रेस म्हणजे चारित्र्य, काँग्रेस म्हणजे देशभक्ती हे सूत्र काँग्रेस भोवती सतत फिरत होते. ‘सेवा’, ‘त्याग’, ‘समर्पण’ ही काँग्रेसची आयुधे होती. महात्माजींनी गांधी टोपी घातली नाही. पण गांधी टोपीचे महत्त्व वादातीत होते. ही टोपी चरित्र्याचे प्रतिक होती. देशभक्तीची पांढरीशुभ्र धवल कथा होती. खादी हा कपड्याचा प्रकार नव्हता. राष्ट्रीय तेजाचा तो अविष्कार होता. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी काँग्रेसने जे काही केले ते अनेक देशांसाठी इतिहास ठरले. गांधीजींच्या नेतृत्त्वाने जगाला नेतृत्त्व दिले. नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रीकेचा स्वातंत्र्याचा लढा लढवला. त्यांचे नेते गांधीजी होते. गांधीजींना  स्वातंत्र्याच्या लढ्याची प्रेरणा  ते दक्षिण आफ्रिकेत असतानाच झाली होती. रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून त्यांना धक्का मारून खाली ढकलून दिले, तोच क्षण कदाचित भारतीय स्वातंत्र्याची बापूंच्या मनातील पहिली ठिणगी असावी. 

काँग्रेसने स्वातंत्र्याचा लढवलेला लढा जगाच्या इितहासात अमर झाला. जगाच्या १७६ देशांतील स्वातंत्र्य मिळवणाऱ्या कोणत्याही देशांनी दोन शब्दांनी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली नाही आणि दोन शब्दांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेले नाही. हा एकच देश असा आहे की, ‘चले जाव’ या दोन शब्दांनी जगाला स्वातंत्र्याचा मंत्र दिला. शब्दात किती तेज असते... निखाऱ्यासारखी धग असते, याचा प्रत्यय या शब्दांनी देशाला दिला आहे.  

‘करेंगे या मरेंगे’ दोनच शब्द. ‘चले जाव’, ‘छोडो भारत’, ‘क्वीट इंडिया’, ‘चलो, दिल्ली’ आणि  ‘जय हिंद’.... फक्त दोनच शब्द. या दोन शब्दांनी इितहास घडवला. जे शस्त्रांनी लढवता आले नसते, ते शब्दांनी घडवून दाखवले. १५ अॉगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन. या तारखेपूर्वी अवघे सहा दिवस ९ आॅगस्ट ही तारीख आज क्रांतीदिनासारखीच तेजस्वी तारीख आहे. या तारखेमागे आणि देशभक्तीमागे ठासून चारित्र्य उभे होते. निर्धार होता. त्यावेळी देशात गावागावात वीज नव्हती.... फोन नव्हते.... फॅक्स नव्हते.... आजच्या डिजीटल दुनियेचा तर विषयच नव्हता. सायंकाळी ७ वाजले की, अंधारात डुंबून जाणारा हा संपूर्ण ग्रामीण भारत गांधीजींच्या प्रकाशाने तेजोमय झालेला होता. सगळे नेते आणि सामान्य लोक त्यागाचे आणि सेवेचे आदर्श होते. जगातल्या कोणत्याही स्वातंत्र्य लढ्यात त्या - त्या देशात एकाचवेळी तोला-मोलाचे डझनभर नेते तुम्हाला कुठेच  सापडणार नाहीत. नेपोलीयन असेल, हो ची मिन्ह असेल... द गॉल असेल... लेनीन असेल... हे सगळे नेते त्या त्या देशातील एक एकटे नेते होते. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात तोडीस तोड चारित्र्याच्या नेत्यांची हिमालयाारगी रांग होती. गांधी- नेहरू- पटेल, सुभाषचंद्र बोलस, मौलाना अबुल कलाम, राजेंद्रबाबू, सरोजीनी नायडू, मदनमोहन, गफार खान, राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, अच्युतराव, एस. एम. जोशी, युसूफ मेहरअली, ....ही सगळी नावं आठवली की, अंगावर रोमांच उभे राहतात.  ब्रिटीशांच्या प्रचंड फोजेसमोर आणि शक्तीसमोर अजिंक्य मनाची  ही निर्धार लढाई सामान्य जनतेने त्याच त्यागाने आणि ताकदीने लढवली. ‘इन्कलाब जिंदाबाद’ ही गर्जना आजही कानात घुमते. परदेशी कपड्याच्या गाडीपुढे आडवा पडलेल्या बाबू गेनू याला महात्मा गांधी काही सांगायला गेले नव्हते. देशातील वातावरणातून हा भारावलेला छोटा तरूण बलिदानाला सहज तयार झाला. कोवळा शिरीषकुमार हा त्यागमय वातावरणाने भारलेला कोवळा तरुण. स्वातंत्र्याचा असा लढा जगात कुठे झाला नाही. व्यक्तीगत जीवनात काही मिळवायची अपेक्षा न ठेवता असंख्य ज्ञाात, अज्ञाात लोकांनी केवढा मोठा त्याग केला. या स्वातंत्र्य चळवळीतील साधी-साधी माणसं किती तेजस्वी होती.... किती प्रामाणिक होती... ‘मी चुकीचा वागलो तर बापूंना आवडणार नाही....’ हे सामाजिक चारित्र्य हाेते. ...

हे चारित्र्य काँग्रेसने दिले. अनेक वर्षे ते िटकवले गेले. आज आपण कोणत्या टोकाकडे िनघालो आहोत... त्याग, सेवा, समर्पण हे शब्द अाज हास्यास्पद ठरले आहेत. राष्ट्रीय भावनेची वाताहत झालेली आहे. प्रादेशिक भावना उन्मत्त झालेली आहे. राजकारणात ‘सेवे’ चे महत्त्व राहिलेले नाही. पैशाचे महत्त्व वाढलेले आहे. ‘त्याग’ शब्द हास्यास्पद ठरलेला आहे. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. चार पिढ्या घडल्या. या पिढ्यांमध्ये चारित्र्याचे अंतर पडत गेले.  आज या प्रश्नांची चर्चा करायला कोणाला वेळ नाही. देशामध्ये ७५ वर्षांत जात- धर्माच्या नावावर किती भिंती उभा केल्या गेल्या. गरीब- श्रीमंत अशी मुख्य भिंत दूर होऊ शकली नाही. गेल्या काही वर्षांत तर गरीब अधिक गरीब झाला आणि सामान्य माणसं सत्ताधाऱ्यांच्या आशिर्वादाने झटकन श्रीमंत झालेले पहायला मिळत आहेत.  गांधीजी पंतप्रधान नव्हते. पण जगाचे नेते हाेते. आज पदावरचे नेते हे देशाचे नेते नाहीत. ते पदामुळे मोठे वाटतात.  

एक किस्सा आठवतो... सरदार पटेल यांनीच तो लिहून ठेवला आहे. सरदार गृहमंत्री झाल्यावर त्यांना दिल्लीमधील १, औरंगजेब रोड, हा सर्वात मोठा शासकीय बंगला राहण्यासाठी दिला गेला. त्या बंगल्यात रहायला गेल्यावर सरदारांनी पंडितजींना पत्र लिहले. त्या पत्रात लिहले होते... ‘एकेकाळी देशावर राज्य करणारा दिल्लीचा सत्ताधीश औरंगजेब आज एका रस्त्यापुरता दिल्लीत मर्यादित झाला. त्याच रस्त्यावर मी रहायला आलो आहे.... दुसरा एक नेता ज्याने पाकिस्तान निर्माण केले. त्यांच्या देशात त्याची आठवण नाही...  मुंबईच्या एका रस्त्याला त्याचे दिलेले नाव त्याचे आडनाव विसरून फक्त महम्मद अली रोड एवढ्याच नावाने ओळखले जाते. आणि आपले बापू जागाच्या अनेक विद्यापीठात शिकवले जातात.’ 

जगाने जो गांधीवाद स्वीकारला तो इथे नाकारण्याची स्पर्धा सुरू आहे. गांधींना ठरवून मारले गेले. गांधीजींना मारणे सोपे होते. त्यांच्याभोवती सुरक्षा कवच नव्हते.... पण, त्यांचा विचार मारणे कुणालाही शक्य नाही. गेल्या काही वर्षांत काँग्रेसची पिछेहाट झाल्यानंतरही गांधी- नेहरूंच्या भूमिकेवरच उद्याची काँग्रेस पुन्हा प्रभावीपणे उभी राहिल. कारण हा खंडप्राय देश सर्व जाती- धर्मांच्या एकोप्यावर प्रभावीपणे उभा राहू शकतो. त्यात भिंती उभारणारे एका समाजाला आज प्रभावी वाटत असले तरी हळूहळू या सगळ्या विघटनाचे अर्थ लोकांना समजू लागलेले आहेत. काँग्रेसने सत्तेचा हव्यास धरण्यापेक्षा या सर्व-धर्म एकोप्याची भूमिका घेवून उभे राहिले पाहिजे. निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला असला तरी काँग्रेसचा विचार पराभूत झालेला नाही. अजूनही गावागावात काँग्रेस आहे... काँग्रेसचा विचार आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता आहे... काँग्रेसचा झेंडा आहे... नेते ितथपर्यंत पोहोचत नाहीत, हा मोठा फरक आहे. काँग्रेस तात्पुरती पराभूत झाली असली तरी उद्याचा दिवस काँग्रेसच्या विचारांचा दिवस आहे. काँग्रेसमध्ये असलेले सगळे दोष टाळून काँग्रेसला पुन्हा एकदा राष्ट्रीय भूमिकेवर उभे रहावे लागेल. 

महाराष्ट्रापुरते बोलायचे तर महाराष्ट्र हे काँग्रेसचे नेतृत्त्व करणारे राज्य अाहे. महात्मा गांधी गुजरात सोडून सेवाग्रामला आले. त्या पुरोगामी महाराष्ट्राने देशाला दिशा दिली. त्या महाराष्ट्रात काँग्रेस का मागे पडत आहे? १९६७ साली देशातील नऊ राज्यांत सत्तेमधून काँग्रेस पराभूत झाली.त्यावर्षी महाराष्ट्रात काँग्रेसचे २०२ आमदार विजयी झाले. १९७२ साली २०२ वरून २२२ वर ही संख्या गेली आहे. आज काँग्रेस ४४ वर आहे. कोणालाही दोष न देता काँग्रसने, काँग्रेस मानणाऱ्यांनी, काँग्रेच्या नेत्यांनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चिंतन करण्याची गरज आहे. कुठे कमी पडतो आहोत, काय चुकते आहे, ते कसे दुरूस्त करता येईल.. लोकांमध्ये कसे मिसळता येईल, हाच विचार काँग्रेसला तारू शकेल. 

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ने १९४२ च्या भारावलेल्या वातावरणाने काहीशी झलक पहायला मिळाली. त्यावेळची घोषणा ‘छोडो भारत’ होती... आताची घोषणा ‘जोडो भारत’ आहे.... कुठून कुठे यावे लागले आहे. अर्थात या पदयात्रेने आठ वर्षांचे देशातील भय आणि दहशत संपत आलेली आहे. लोक धीट झाले आहेत... ते आता कुणाला घाबरत नाहीत. म्हणून लाखोंच्या संख्येने राहुल गांधी यांच्या मागे हे सामान्य लोक आले. हेच काँग्रेसचे सामर्थ्य आहे. सोशल मीडियानेही सर्व वृत्तपत्रांना पराभूत करून टाकले. सामान्य माणसांची जागरूकता हेच आजच्या काळातील सगळ्यात मोठे जागरण आहे. देशात एकत्त्वाची भावना निर्माण करणे, जाती- धर्माच्या भिंतीच्या पलिकडे काँग्रेस संस्कृती निर्माण झाली.. मौलाना अबुल कलाम यांचा उजवा हात गंधाचा टिळा लावणाऱ्या मदन मोहन मालविया यांनी  धरला होता. तर डावा हात वीर नरीमन यांच्या हातात होता... काँग्रेस हे देशाच्या एकात्मतेचे प्रतिक त्यामुळेच झाले. आजच्या ‘भारत जोडो’चा तोच अर्थ आहे. ‘छोडो भारत’कडून ‘जोडो भारत’ या घोषणेचाही तोच अर्थ आहे. 

सध्या एवढेच.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.