सांगली : वतन जमीनीची विक्री करण्यासाठी जमिन मालकास परवानगी देण्याकरिता दीड लाख रुपयांची लाच स्विकारताना जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळवहिवाट शाखेतील अव्वल कारकून अनंता विठ्ठलराव भानुसे (वय ५९, रा. क्रांतीनगर, विजयनगर सांगली ) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्याचबरोबर रोजगार हमी योजनेत कार्यरत असणारा लिपिक दिलीप निवृत्ती देसाई यास लाच देण्यास प्रोत्साहित केले म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.
महारवतनाची जमीन विक्री करण्याची परवानगी मिळण्याकरिता तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेला अर्ज वरीष्ठांना सांगून मंजूर करुन देण्यासाठी स्वत:करीता व वरिष्ठांना देण्याकरीता दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी भानुसे यांनी केली होती. त्याची तक्रार १९ जानेवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदार यांनी केली. विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये सत्यता असल्याचे आढळले. तसेच रोहयोमधील लिपीक दिलीप देसाई यांनी तक्रारदार यांना भानुसे यांना लाच देण्यास प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान अनंता भानुसे हा दोन ऐवजी दिड लाखाची लाच तक्रारदाराकडून स्विकारण्यास तयार झाला. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपहारगृह आवारात दुपारच्या सुमारास कारकुन भानुसे यास लाच देण्याचे ठरले होते. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने परिसरात सापळा लावला.
त्यावेळी तक्रारदार यांच्याकडून दीड लाखाची लाच घेताना अव्वल कारकून अनंता भानुसे यास रंगेहात अटक करण्यात आली. तसेच लिपीक दिलीप देसाई यास ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.