पौष्टीक तृणधान्याचे महत्व जनतेपर्यंत पोहचविण्यास व्यापक जनजागृती व प्रसिद्धी करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली :- संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष "आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष" म्हणून घोषित केले आहे. त्यानूसार पौष्टीक तृणधान्याचे महत्व सर्व जनतेपर्यंत पोहचविणे तसेच आहारात त्याचा वापर करण्यासाठी कृषी विभागासह सर्व यंत्रणांनी व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कार्यकारी समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षेखाली संपन्न झाली. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, कृषी उपसंचालक प्रियांका भोसले यांच्यासह समितीचे सदस्य व संबधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष "आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष" म्हणून घोषित केले आहे. केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाने "आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ देशामध्ये साजरे करण्याच्या अनुषंगाने पौष्टीक तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ करणे, तृणधान्यांमधील पोषण मूल्यांमुळे त्यांचे आहारातील अनन्यसाधारण महत्व विचारात घेऊन लोकांच्या आहारात त्यांचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे, त्याअनुषंगाने विविध उपक्रमांचे आयोजन करणे. यासाठी कृषि विभाग आणि सर्व संबंधित प्रशासकीय विभागामार्फत विविध उपक्रम राबवावेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागांनी/यंत्रणांनी सक्रीय सहभाग घेऊन पौष्टीक तृणधान्याचे महत्व सर्व जनतेपर्यंत पोहचविणे व अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.
पौष्टिक तृणधान्याचा आहारामध्ये अधिकाधिक वापर व्हावा यासाठी कृषि विभाग, पोलीस विभाग व इतर सर्व विभागांना शासकीय बैठका व कार्यक्रमाच्या ठिकाणी नाष्टा व जेवणामध्ये पौष्टीक तृणधान्य पासून बनवलेले पदार्थांचा समावेश करावा. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पाककला स्पर्धा स्पर्धाबरोबरच रोड शो, रॅली, मॅराथॉन स्पर्धा आयोजित कराव्यात. तसेच जिम ओनर व त्यांचे प्रशिक्षक यांच्या मदतीने पौष्टिक तृणधान्य पदार्थाचा आहारामध्ये समावेश करणे याबाबतही प्रचार प्रसिद्धी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत दिल्या. तंत्र अधिकारी (विस्तार) श्रीमती मयुरा काळे यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने बैठकीत माहिती सादर केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.