सोलापूरात पुलावरून कोसळून एकाचवेळी ११ काळविटांचा मृत्यू!
सोलापूर : सोलापूर-विजयपूर महामार्गावरील केगाव बायपास येथून रस्ता ओलांडताना जवळील उड्डाण पुलावरून १४ काळवीट खाली कोसळले. ३५ फूट उंचीवर खाली पडल्याने ११ काळवीटांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हिरजच्या माळरानावरून सोलापूर शहरालगत असलेल्या शिवाजी नगर परिसरात १४ काळवीटांचा कळप येत होता. त्यावेळी माघून येणाऱ्या वाहनाला अथवा पाठलाग करणाऱ्या कुत्र्याला घाबरून या काळपाने उड्डाण पुलावरून खाली उडी मारली. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. एक हरीण जखमी अवस्थेत पुढे निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. यापूर्वी त्याच परिसरात अनेकदा हरणांचा अपघात झाला आहे. शनिवारी (ता. २८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. वन विभागाला त्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आणि काही वेळातच उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील घटनास्थळी दाखल झाले. जखमी काळविटांना तातडीने पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे श्री. पाटील यांनी ‘सकाळ’शी बालताना सांगितले. जखमी काळविटांचीही प्रकृती नाजूक असल्याचेही सांगण्यात आले. या अपघातानंतर त्या मुक्या वन्यजीवांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महामार्ग प्राधिकरणाकडून पत्राची दखल नाही
वन्यजीवांचा अधिवास असलेल्या ठिकाणांहून जाणाऱ्या महामार्गांवरील पुलाच्या ठिकाणी विशेषत: जिथे डोंगर फोडून रस्ता किंवा पूल तयार केला आहे अशा ठिकाणी वन्यजीवांचे अपघात होत आहेत. तेथे त्यांचा जीव वाचावा म्हणून काहीच उपाययोजना नाहीत. सांगोला, बार्शी, माळशिरस, पंढरपूर, विजयपूर अशा अनेक राष्ट्रीय महामार्गांवर तशी स्थिती आहे. त्यासंदर्भात वन विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचआय) अनेकदा पत्रव्यवहार केला. पण, त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे अपघातात अनेक प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. आता वन विभाग पुन्हा एकदा ‘एनएचआय’ला त्यासंबंधीचे पत्र देईल. आम्हीही त्यादृष्टीने उपाययोजना करू, अशा दुर्दैवी घटना टाळण्याचा त्यातून प्रयत्न करू, अशी ग्वाही उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.