आज 74 वा प्रजासत्ताक दिन, देशभर उत्साहाचं वातावरण
आज 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकघोषित करण्यात आले. आजच्या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.
26 जानेवारी देशाचा राष्ट्रीय सण
वैविध्यपूर्ण धर्म, श्रद्धा आणि संस्कृतींचा देश असलेल्या भारतात दररोज काही ना काही सण साजरे केले जातात. आपल्या देशात प्रत्येक धर्मात सण साजरे करण्याची परंपरा आहे, परंतू, काही सण असे आहेत जे प्रत्येक देशवासीयांसाठी महत्त्वाचे आहेत. ते देशभर आदराने आणि आपुलकीने साजरे केले जातात. 26 जानेवारी हा देखील असाच एक सण आहे. जो देशाचा राष्ट्रीय सण आहे. देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा किंवा पंथाचा असो, हा दिवस संपूर्ण देशभक्तीने साजरा करतो. इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.
26 जानेवारी 1930 रोजी देशात प्रथमच पूर्ण स्वराज दिन साजरा
26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. तत्पूर्वी, 26 जानेवारी 1930 रोजी देशात प्रथमच पूर्ण स्वराज दिन किंवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पुढील 18 वर्षे या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 हा दिवस अधिकृतपणे स्वातंत्र्यदिन म्हणून घोषित करण्यात आला.
डॉ. राजेंद्र प्रसाद देशाचे पहिले राष्ट्रपती
संविधान सभेने 1950 मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली. त्यांनी 1952 मध्ये पहिली आणि 1957 मध्ये दुसरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. राजेंद्र प्रसाद मे 1962 पर्यंत भारताचे राष्ट्रपती राहिले. त्यांचा कार्यकाळ सर्व राष्ट्रपतींमध्ये सर्वात मोठा आहे.
कसा आहे दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम
सकाळी 10.22 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्तव्यपथ येथे पोहोचतील. सकाळी 10.25 वाजता उपराष्ट्रपती कर्तव्यपथ येथे पोहोचतील. सकाळी 10.27 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि यावेळेचे प्रमुख पाहूणे इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सीसी कर्तव्यपथ येथे आगमन. राष्ट्रपती आणि प्रमुख पाहुण्यांचे पंतप्रधानांकडून स्वागत.
संरक्षण मंत्री, संरक्षण राज्यमंत्री, चिफ ऑफ डिफेन्स, तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यांचा पंतप्रधानांकडून परिचय. राष्ट्रपती, प्रमुख पाहुणे आणि पंतप्रधान व्यासपीठावर विराजमान होतील. त्यानंतर ध्वजारोहण होईल. त्यावेळी राष्ट्रपतींचे अंगरक्षक सलामी देतील. यावेळी बॅण्डवर राष्ट्रगीत आणि 21 तोफांची सलामी दिली जाईल. सकाळी 10.30 वाजता प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला सुरूवात होईल. संचलन साधारण दुपारी 12.05 वाजेपर्यंत चालेलं. विविध राज्यांचे सांस्कृतिक रथ, त्यानंतर दुचाकी स्टंट. विमानांच्या कवायती आणि सलामी, यानंतर पाहुण्यांना सलामी दिली जाईल. राष्ट्रपती आणि प्रमुख पाहुणे मार्गस्थ होतील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.