Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अदानी समूहाला 65 अब्ज डॉलरचा फटका

अदानी समूहाला 65 अब्ज डॉलरचा फटका


नवी दिल्ली:  अमेरिकास्थित गुंतवणूक सल्लागार संशोधन करणारी हिंडनबर्ग या कंपनीने अदानी समूहाशी संबंधित एक अहवाल जाहीर केल्यानंतर अदानी समूहाला मोठा आर्थिक फटका बसतांना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहाच्या बहुतांश कंपन्यांच्या शेअर्समधील घसरण सोमवारी तिसर्‍या दिवशीही कायम राहिली. यामुळे अदानी समूहाला तीन दिवसांत तब्बल 65 अब्ज डॉलरचा (सुमारे 5.3 लाख कोटी रुपये) फटका बसला आहे. त्यामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप 65 अब्जाने कमी झाले आहे.

अदानी समूहाने हिंडेनबर्गला तब्बल 413 पानांचे स्पष्टीकरण दिल्यानंतर देखील त्यांनी अदानी समूह राष्ट्रवादाचा मूलामा देऊन भारतीयांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर समभागांच्या घसरणीमुळे कंपनीचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या निव्वळ संपत्तीतही मोठी घसरण झाली आहे. तीन दिवसांत त्यांची संपत्ती सुमारे 37 अब्ज डॉलरने कमी झाली. फोर्ब्सच्या मते, अदानी यांच्या संपत्तीत आज 8.3 अब्ज डॉलरची घट झाली आहे आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते आठव्या क्रमांकावर घसरले आहेत. 

अदानी समूहाच्या सूचीबद्ध दहापैकी सात कंपन्यांचे समभाग तिसर्‍या दिवशीही घसरले. सर्वात मोठी घसरण अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये झाली आहे. या कंपन्यांचे समभाग 20 टक्क्यांच्या घसरणीसह लोअर सर्किटला आले. अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्सही 18.11 टक्क्यांनी घसरले. अदानी पॉवर, अदानी विल्मर आणि एनडीटीव्ही 5 टक्के आणि अदानी पोर्ट्स 1.11 टक्क्यांनी घसरले. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस 3.36 टक्के, एसीसी 0.48 टक्के आणि अंबुजा 2.15 टक्के वाढली. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, अदानी यांच्या संपत्तीत आज 8.3 अब्ज डॉलरची घट झाली आहे आणि श्रीमंतांच्या यादीत ते आठव्या क्रमांकावर घसरले आहेत. दरम्यान, अदानी समूहाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स असेच घसरत राहिल्यास अदानी समूहाच्या संपत्तीत मोठी घसरण होण्याची शक्यता निर्माण होत आहे. तसेच यामुळे अदानी समूहाच्या अडचणीत देखील वाढ होऊ शकते.

एलआयसीने गमावले 16 हजार कोटी - हिडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यात कमालीची घसरण पहायला मिळाली. या घसरणीनंतर एलआयसीने देखील दोन दिवसांत तब्बल 16850 कोटी रुपयांचे नुकसान झाले. अदानी समुहाच्या शेअर्समधील घसरणीनंतरही एलआयसीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एलआयसी कंपनीने अदानी समुहात अंदाजे 28 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. अदानी समुहातील शेअर्समधील घसरणीनंतरही एलआयसीची गुंतवणूक मालमत्ता मूल्य अंदाजे 56 हजार कोटी रुपये होती. याचाच अर्थ अदानी समूहाच्या शेअर्स घसरणीनंतरही एलआयसीला 28 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.