Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत चोरट्याकडून 14 लाखांचा मुद्देमाल जप्त..

सांगलीत चोरट्याकडून 14 लाखांचा मुद्देमाल जप्त.. 


सांगली :  घरफोडीसह दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास यश आले. तब्बल १० घरफोड्यांसह १३ दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा छाडा लावण्यात आला. संशयिताकडून दुचाकी, दागिन्यांसह १३ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित हा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. तौफिक सिकंदर जमादार (वय २९, रा. उमळवाड चर्चजवळ, ता. शिरोळ) असे त्याचे नाव आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शहरासह परिसरात घरफोड्यांसह दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यातील संशयितांचा शोध घेवून कारवाईचे आदेश अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर अधीक्षक आंचल दलाल यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे.

ते पथक शहरात गस्तीवर होते. त्यावेळी अंकली फाटा परिसरात एक संशयित बिना क्रमांकाच्या दुचाकीवर येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. एकजण संशयास्पदरित्या मिळून आला. सखोल चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय बळावल्याने पोलिसी खाक्या दाखवत त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या सॅकमध्ये चांदीच्या मुर्ती व अन्य दागिने सापडले. सखोल चौकशी केली असता महात्मा गांधी पोलिस चौकीत संशयितावर घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. तसेच कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याचेही समोर आले. त्यानुसार तौफिक जमादार यास अटक करण्यात आली. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत कुंभोज, शिरोळ, निमशिरगाव, औरवाड, हरिपूर, विश्रामबाग या परिसरात दुचाकी चोरल्याची समोर आले. त्या दुचाकी शामरावनगर येथील साई कॉलनी व उमळवाड येथे लावल्याच संशयिताने सांगितले. त्यानुसार पथका दोन्ही ठिकाणहुन साडे सहा लाखांच्या १३ दुचाकी जप्त केल्या. 

दरम्यान, घरफोडीच्या अनुषंगाने संशयिताकडे चौकशी करण्यात आली. त्यानुसार काही दिवसांपुर्वी पोळ मळा, मिरजेतील ख्वॉजा वस्ती, शामरावनगर, मिरजेतील साई कॉलनी, शंभर फुटी रस्ता, मिरजेतील विद्यानगर, सांगली बसस्थानक परिसर, शाहू उद्यान परिसर, गारपीर परिसरातील बंद घरांचा कडीकोयंडा उचकटून घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानुसार संशयिताकडून सोन्या-चांदीचे दागिने, तांब्याची भांडी असा सात लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित तौफिक जमादार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सांगलीसह संखेश्वर, विजापूर येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. कारवाईत चेतन महाजन, संदीप नलवडे, मेघराज रूपनर, निलेश कदम, शशिकांत जाधव यांचा सहभाग होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.