Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विदर्भ, मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी ३००० कोटी

विदर्भ, मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी ३००० कोटी


नागपूर :
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कापूस आणि सोयाबीन यांच्या व्हॅल्यू चेन्स (मूल्य साखळी) विकसित करण्यात येतील. 
त्यासाठी तीन हजार कोटी रुपयांपर्यंत भरीव अशी वाढीव तरतूद करून ही योजना २०२५ पर्यंत राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे विदर्भ-मराठवाड्यासाठी कोणते पॅकेज घोषित करणार याची उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी घोषणांची बरसातच केली.

सध्या शेतीशाळा, शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके यातून विविध व्हॅल्यू चेन्स आम्ही विकसित करत आहोत. या योजनेत शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करण्यात येत असून, जीनिंग आणि प्रेसिंग युनिट, ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यासाठी अनुदान, बीजप्रक्रिया युनिट, तेलघाणा प्रक्रिया युनिट, जैविक निविष्ठा निर्मितीकरिता मास्टर लॅब आणि बेसिक लॅब स्थापन करणे अशा विविध गोष्टींची सांगड घातली जाईल, असे त्यांनी सांगितले.

धान उत्पादकांना हेक्टरी १५ हजारांचा बोनस

राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्यात येत असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले. दोन हेक्टरपर्यंत हा बोनस दिला जाईल. म्हणजे शेतकऱ्यांना ३० हजार रुपयांपर्यंत लाभ होईल. या बोनसचा फायदा पाच लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

नवे वस्त्रोद्योग अन् खनिकर्म धोरणदेखील आणणार

विदर्भात मोठा खनिज साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याच्या दोन खाणी असल्याचा अहवाल आला आहे. विदर्भाला लवकरच सोन्याचे दिवस येणार आहेत. येथील खनिजांवर येथेच प्रक्रिया केली जाईल. नवे वस्त्रोद्योग धोरणदेखील लवकरच जाहीर केले जाईल. खनिज, ऊर्जा, पाणी, वन, शेती ही विदर्भाची बलस्थाने आहेत. येणाऱ्या काळात उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात विदर्भात क्रांती झालेली आपण पाहाल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

विदर्भ-मराठवाडा टुरिझम सर्किट उभारणार

समृद्धी महामार्गामुळे आता पर्यटनाला चालना मिळेल. धार्मिक व इतर पर्यटनाचे टुरिझम सर्किट विदर्भ, मराठवाड्यासाठी उभारले जाईल. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा आणि लोणार सरोवर पर्यटन विकास आराखड्यानुसार कामे वेगाने पूर्ण केली जातील.

ठळक घोषणा

* नागपूरपासून विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा 'इकॉनॉमिक कॉरिडॉर' शक्तिपीठ महामार्ग विकसित करणार.

* विदर्भ, मराठवाड्यात ७० हजार कोटींची गुंतवणूक त्यातील ४४ हजार १२३ कोटी विदर्भात होईल. ४५ हजार रोजगार निर्मिती.

* अंचलेश्वर, कचारगड लेणी, भोजाजी महाराज, कोराडी देवी, तसेच नांदेड जिल्ह्यातील मंदिरांचे प्रस्ताव केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेत समाविष्ट होणार.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.