Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सत्तर... बेहत्तर! - मधुकर भावे

सत्तर... बेहत्तर! - मधुकर भावे


जबर संगीत...  जबरदस्त गायक... बेभान करणारा ‘विरंगुळा’

काही योगायोग मोठे विलक्षण असतात. २८ नोव्हेंबर हा दिवस महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन. भायखळ्याच्या सावता महाराज सभागृहात स्मृतिदिनाचा एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता.  भायखळ्याचे सामाजिक समता परिषदेचे फार मोठे कार्यकर्ते हेमंतराव मंडलिक यांनी कार्यक्रमाला आगत्याने बोलावले. शाहीर मधुशेठ नेराळे, शाहीर मधुकर खामकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, पत्रकार श्रीमती राही भिडे आणि प्रख्यात ‘मराठी बाणा’चे अशोक हांडे असे सगळे दिग्गज असताना हेमंतरावांनी आगत्याने  मला बोलावले. अशा कार्यक्रमांमध्ये औचित्याची भाषणे असतात, असे समजून गेलो आणि तब्बल ३ तास कार्यक्रमात खिळून राहिलो. आज तोच विषय लिहितो आहे. या सभागृहात सावता महाराज आणि महात्मा ज्योतिबा, सावित्रीबाई यांची छान तैलचित्रे आहेत. सभागृहात गेल्यावर प्रथम या तैलचित्रांना मन:पूर्वक नमन करताना १०० वर्षांपूर्वीचा तो सगळा काळ वाचलेल्या शब्दांतून पुढे सरकला.... त्या सावित्रीबाई... स्वत: शिकून महिलांना शिकवायला बाहेर पडल्या. पुण्यातील सनातनी महिला आणि पुरुषांना हे सहन झाले नाही. त्यांनी नुसताच विरोध केला नाही तर, शेण मारले, अंगावर थुंकले... शांत सावित्रीबाईंनी प्रतिवाद केला नाही. बरोबर एक लुगडं ठेवलं. माखलेले लुगडं बदलून त्यांनी आपले शिक्षणाचे काम सुरू ठेवले. आज ‘सावित्रिच्या लेकी’ जग पादाक्रांत करीत आहेत. कोणाला कल्पना होती... ज्या सावित्रीमाऊलीवर पुण्यातील कर्मठ लोक थुंकले होते त्याच पुण्यातील विद्यापीठाला ‘सावित्रीबाई फुले विद्यापीठ’ या नामकरणाने सन्मानित करण्यात येईल. महाराष्ट्राच्या अभिमानाचे जी नामकरणे आहेत त्यात हे एक आहे. महात्मा फुले यांना नमन करताना मनात विचार आला होता, या महात्म्याची ‘पगडी’ आणि त्यांच्या खांद्यावरील ‘घोंगडी’ आज पुण्यातील अनेक समारंभांच्या सन्मानाची मुख्य प्रसादचिन्हे झाली आहेत. अगदी राष्ट्रपतींनासुद्धा याच पगडी आणि घोंगडीने सन्मानित करण्यात आलेले आहे. बाजुचे छायाचित्र सावता महाराजांचे. मळ्यातील भाजी-पाल्याचे तण उपटताना सावता महाराजांच्या मनात विचार आले की, ‘अरे, मी मळ्यातील तण उपटतोय... पण, मनातल्या अविचारांच्या तणाचे काय?...’ त्या क्षणाला त्यांना आत्मज्ञाान झाले... सावता महाराज, नामदेव महाराज, नरहरी महाराज, गोरोबा महाराज, रोहिदास महाराज.... १८ पगड जातीचे संत. ज्ञाानोबांपासूनची ही परंपरा. १२०० व्या शतकातील संत ज्ञाानेश्वर महाराज. १६०० व्या शतकातील संत तुकाराम महाराज. या मधल्या ४०० वर्षांत हे सगळे १८ पगड जातीचे संत झाले आिण त्यांच्या मांदियाळीने महाराष्ट्राच्या भागवत धर्माची पताका चंद्रभागेच्या तीरावर आज हजारो वर्षे उजळत आहे. ही सगळी संत परंपरा महाराष्ट्राची विद्यापीठे आहेत. कोणत्या विद्यापीठात शिकले होते हे सगळे संत... उत्तर नाही. ४०० वर्षांच्या फरकानंतर ज्ञाानोबांशी तुकोबा जोडले गेले. (ग्यानबा-तुकाराम) जगात असे दोन संत दाखवा, ४०० वर्षांच्या फरकाने त्यांना  एका नामस्मरणात एकत्र जोडलेले आहे. अशी ही छान संत परंपरा... खरं म्हणजे महाराष्ट्राचे हे तत्त्ववेत्तेच आहेत. एका सिद्धांताने- (मनुष्य मर्त्य आहे) हे सांगणारा सॉक्रेटीस तत्त्ववेत्ता झाला. वर्गात मुलांना शिकवत होता... ‘तुम्ही सगळे मर्त्य आहात... जग मर्त्य आहे...’ सॉक्रेटीस म्हणाले. विद्यार्थ्यांनी विचारले की, ‘तुम्ही मृत पावल्यावर तुम्हाला कशात पुरायचे?’ तो तत्त्ववेत्ता म्हणाला... ‘तुम्ही मला कोण पुरणार... मी जगाला पुरून उरणार आहे....’ आमचे संत आणि तत्त्ववेत्ते दहा जगांना पुरून उरतील. आमच्या संतांच्या ओवी-ओवींमध्ये एक सिद्धांत नाही... हजार सिद्धांत आहेत... आपण या सर्वांना ‘तत्त्ववेत्ते’ न मानता संत मानले... मनातील भाव जपला असला तरी त्यांच्या तत्त्ववेत्तेमागची विद्वत्ता नकळत दुर्लक्षित झाली... 

मुख्य कार्यक्रमाला येवून बसेपर्यंत असे अनेक विचार मनात येत होते. मला वाटले, आता भाषणाचा कार्यक्रम असेल. हेमंत मंडलिकांनी वेगळीच कल्पना लढवली. मुंबईमधील ६५-७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या एका वाद्यवृंदाचा ‘आदरांजली’ कार्यक्रमच त्यांनी सादर केला. ‘विरंगुळा’ हे त्या वाद्यवृंदाचे नाव. त्यातील प्रत्येक कलावंत हौशी कलावंत. मान्यता नाही... प्रसिद्धी नाही... पण, सार्वजनिक जीवनात वावरताना कोणी निवृत्त होत नाही. निश्चय आणि जिद्द असेल तर आपल्या जवळ जे आहे ते समाजाला किती प्रभावीपणे देता येते, याचा अनुभव घ्यायचा असेल तर या ज्येष्ठ नागरिकांनी सादर केलेला ‘विरंगुळा’ या संस्थेचा हा संगीत कार्यक्रम तीन तास खिळवून ठेवून गेला. 

यातील कोणीही कलावंत व्यवसायिक नाही. हौस आणि आवड म्हणून संगिताची साधना त्यांनी जपली... वाढवली. वाद्यवृंदमधील सगळे हौशी कलावंत... तबला आणि ढोलकी दोन्ही वाजवत असताना जबरदस्त गीत सादर करणारे दिलीप मेस्त्री हे ६५ वर्षांचे. त्यांनी सादर केलेले गीत... ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती....’ काय बहारदार गीत सादर केले.... हे गीत सादर करणे लेच्यापेच्याचे काम नाही. भारदस्त  आवाज हवा. मी अनेक संगिताचे कार्यक्रम पाहिले.... पण, तबला वाजवणारा किंवा ढोलकी वाजवणारा तबला वाजवतच गीत गात आहे, हा अनुभव निराळा. गणेशस्तवन म्हणणारे आणि नंतर जय जय महाराष्ट्र गीत म्हणणारे अशोक अंकर्ले ७० वर्षांचे. केवढा त्यांचा धारदार आवाज. ‘नाच नाच नाच राधे’ हे गीत रागदारीवरचे... भरत कस्तुरे यांनी सादर केलेले गीत जबरदस्त टाळ्या घेवून गेले. कांतीलाल परमार यांनी गायलेले ‘विठू माऊली तू....’ हे गीत म्हणजे पांडुरंगाची आरतीच अाहे. ‘कानडा राजा पंढरीचा...’ हे गीत गाणारे उल्हास हरमळकर हे ही गुणवंत कामगार. या गायकांमध्ये ‘नामवंत’ कुणीही नाही. त्याची गरज नाही. ‘गुणवंत’ असण्याची गरज आहे. आणि वाद्यवृंदाने हे दाखवून दिले की, आजच्या या साठमारीच्या जगात किती छान जगता येते... संगीताचा आनंद कसा मोकळ्या मनाने वाटता येतो... हा सगळा कार्यक्रम पाहताना मनस्वी कौतुक याचे वाटले की, कामगार भागातील ही सगळी लालबाग- परळची मंडळी. या कार्यक्रमात महिलाही आघाडीवर होत्या. वंदना भाटोडेकर यांनी गायलेले ‘रेशमाच्या धाग्यांनी’, अर्चना ठाकूर ताईंनी गायलेले ‘तुझ्या ऊसाला लागल कोल्हा’ आणि नंतरची हिंदी गीतं... हा सगळाच कार्यकम असा काही खिळवून ठेवून गेला.... छोटे सभागृह, रसिकांचीही फार मोठी गर्दी नाही. पण दर्दी खूप. आणि या कलावंतांच्या या वयातील उत्साहाला दाद देणारी गर्दी. मी हेमंतरावांना विचारले, ‘कुठून शोधून काढलात हा वाद्यवृंद?’आणि त्या सगळ्या वाद्यवृंदाची माहिती संचलन करणारे श्री तावडे यांनीच दिली. आपल्याला असे वाटत असते की, राजकारण बरबटलेले आहे... म्हणजे बाकी सगळे समाज जीवन घाणेरडे आहे.... पण, समाजात प्रकाशाची बेटे खूप आहेत. त्यातील एक एक दिवा तेवत ठेवणारे असंख्य कार्यकर्ते विविध क्षेत्रांत काम करीत आहेत. हे एक संगिताचे क्षेत्र झाले. प्रसिद्धीची हाव न धरता संध्याकाळच्या आयुष्यात हे सगळे गायक केवढा आनंद निर्माण करीत आहेत.. अनेकांना गळा असतो.... बहुसंख्य लोकांना घसा असतो.... पण, संगिताचे सामर्थ्य जवळपास प्रत्येकालाच कळते. डोंबाऱ्याचा खेळ चालू असताना दोरीवरून चालणाऱ्या मुलीचा तोल, खाली वाजणाऱ्या ढोलकीवर तोलला जातो.... ढोलकी थांबली की, मुलीचा तोल जातो. संगीताची ही ताकद आहे. आणि अशा क्षेत्रात समाजातील सत्तरीच्या पुढे गेलेले कलावंत जिद्दीने म्हणत आहेत.... ‘सत्तर.... बेहत्तर...’ काय आवाज.... काय गाण्याची तडफ... सगळं काही विसरायला होतं आणि या जिद्दीला नमस्कार करण्यासाठी हात आपोआप जोडले जातात. एवढे सामर्थ्य या वाद्यवृंदात आहे. 

नंतर मािहती घेतली, त्या माहितीने तर आजच्या समाज जीवनातील अशा प्रकाश बेटांचा  केवढा मोठा अिभमान वाटला. अशा या संस्थांना महाराष्ट्रभर पोहोचवले पाहिजे. सगळेच काही बिघडलेले नाही. सगळेच काही भ्रष्ट नाहीत... सगळीच क्षेत्रं बरबटलेली नाहीत. राजकारण्यांनी महाराष्ट्राला लाज आणली असली तरी अजून विविध क्षेत्रांतील सुसंस्कृत, सज्जन, चारित्र्यवान कार्यकर्ते महाराष्ट्राचे विविध क्षेत्रातील मोठेपण आपआपल्या परिने जपत आहेत. सगळ्यांनाच चॅनलवल्यांच्या गर्दीपर्यंत पोहोचता येत नाही. शिवाय त्यांना प्रसिद्धीची हावही नाही. अशी ही अनेक माणसं आपआपल्या क्षेत्रात उत्तुंग काम करत आहेत. 

या ‘विरंगुळा’चे वाद्यवृंद कलावंत नुसतेच हा कार्यक्रम सादर करीत नाहीत... त्यांची मातृसंस्था ‘स्वामी’ या नावाने फार मोठे सामाजिक कार्य करते. कोरोना काळात या संस्थेने खूप मोठे काम केले. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी अनेक गरजुंना धान्य वाटप, आर्थिक मदत... कॅन्सरग्रस्त रुग्णांबरोबर परगावाहून आलेल्यांची माहिती घेवून त्यांना कपडे, साबण, तेल, टॅावेल याचा पुरवठा केला जातो. कर्जत तालुक्यातील आदिवासी पाड्यांत जावून या संस्थेने ५०० विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके, कंपासपेटी, रंगपेटी याचे वाटप केले. 

या कार्यक्रमाला गेलो नसतो तर समाजातील या एका मोठ्या प्रकाश बेटाचा मला शोधही लागला नसता. समाज जीवनात काम करताना अशा या माणसांना केवढे सामाजिक भान आहे आणि आमचे राज्यकर्ते, आमचे आजचे राजकारणी कशात गुरफटून गेले आहेत! महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणाऱ्यांना त्याची लाज नसली तरी सामाजिक भान असलेल्या संस्था हतबल झालेल्या नाहीत. याचा प्रत्यय या संस्थेचा परिचय  करून घेताना आला. हेमंतरावांचे मन:पूर्वक आभार मानले. या वाद्यवृंदवाल्यांनाही आपण महाराष्ट्रभर पोहोचवू या.... काही मोठे कलावंत असे आहेत की, ते मोठे झाल्याबरोबर त्यांचे भाव एकदम गगनाला भिडतात. पण अशा छोट्या-छोटया संस्था आणि त्यातील कलावंत किती मनापासून केवढा मोठा आनंद देतात. कारण, हे कलावंत पैशासाठी काम करीत नाहीत. समाजाच्या आनंदासाठी आपली कला पणाला लावतात. त्यामुळेच ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’... ही भावना समाजात आपोआप निर्माण होते. 

२८ नोव्हेंबरच्या सायंकाळी हीच भावना घेवून कार्यक्रमातून उठलो. हेमंतरावांना म्हणालो... ‘हेमंतराव, दहा मिनिटांकरिता आलो होतो.... तुमच्या कार्यक्रमाने तीन तास खिळवून ठेवले. 

'आज की शाम हेमंतराव आपके नाम...'

ज्यांना संपर्क करायचा असेल यांच्याकरिता पत्ता मुद्दाम देत आहे. 

विरंगुळा वाद्यवृंद, परेळ पोस्टाची गल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेळ, मुंबई, ४०० ०१२ संपर्क : मोहन कराटे ९८६९२६७०८०


- मधुकर भावे


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.