भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी, भावावर गुन्हा दाखल!
भरदुष्काळात जनावरांच्या चारापाण्यात भ्रष्टाचार करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी बनावट कागदपत्रे तयार करून चक्क देवालाच फसवले. जिल्हय़ातील मंदिर देवस्थानच्या शेकडो एकर जमिनी धस यांनी बोगस व्यवहार करून हडपल्या. अगोदर गुन्हा दाखल करा, नंतर तपास करा असा आसुड उच्च न्यायालयाने ओढल्यानंतर सुरेश धस यांच्यासह त्यांची पत्नी, भावासह 29 जणांवर आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आष्टी तालुक्यातील आठ देवस्थानच्या शेकडो एकर जमिनीचा हा घोटाळा आहे. आमदार सुरेश धस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून तसेच महसूल खात्यातील अधिकाऱयांना हाताशी धरून या जमिनी लाटल्या. बोगस कागदपत्रांच्या आधारे या जमिनींचा व्यवहार करण्यात आला. यामध्ये देवस्थानच्या इनामी जमिनी, शासनाच्या मालकीच्या तसेच सहकार विभागाच्या जमिनींचाही समावेश आहे. यापैकी काही जमिनींवर प्लॉटिंग करण्यात आले आणि लाखो रुपयांना ते प्लॉट विकण्यात आले. मात्र हा सगळा व्यवहारच बोगस असल्याचे समोर आले आणि ज्यांनी प्लॉट घेतले त्यांनी आमदार धस यांच्यासह महसुली अधिकाऱयांविरोधात शिमगा केला. सामाजिक कार्यकर्ते रामदास खाडे यांनी या जमीन घोटाळय़ाला वाचा फोडली.
जमीन घोटाळय़ाच्या चौकशीसाठी विशेष पथक नेमण्यात आले; परंतु पुढे काहीही झाले नाही. त्यामुळे खाडे यांनी न्यायालयात धाव घेतली. जमीन घोटाळय़ात अगोदर गुन्हा दाखल करा आणि नंतर तपास करा, असा दणका उच्च न्यायालयाने दिला. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तसेच लाचलुचपत खात्याकडे करण्यात आलेली तक्रारच ग्राहय़ धरण्यात यावी असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट म्हटले. उच्च न्यायालयाच्या आदेशाला आमदार धस यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले; मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचाच आदेश कायम ठेवला. न्या. मंगेश पाटील आणि न्या. अभय वाघवसे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.