बेळगावात पाय ठेवाल तर कायदेशीर कारवाई करू!
दोन राज्यांतील सीमाप्रश्न केव्हाच संपला आहे. तुमच्या आक्षेपांवरचा वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे. तेथेच लढू . इथे येऊन राज्याची शांतता व सुव्यवस्था बिघडवू नका. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटक सरकार दिवसेंदिवस आक्रमक होत असतानाही मिंधे सरकारकडून मात्र मिळमिळीत आणि बोटचेपी भूमिका घेतली जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा, बेळगावात पाय ठेवाल तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी दिली आहे. महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यामुळे बेळगावातील वातावरण बिघडेल, असे बोम्मई यांनी म्हटले आहे.
सीमा भागातील प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. या मंत्र्यांच्या नियोजित बेळगाव दौऱ्याला कर्नाटक सरकारकडून आक्षेप घेण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी तर, बेळगावमध्ये येण्याचे धाडस केल्यास कायदेशीर उपाययोजना केल्या जातील, असा इशारा दिला आहे. इशारा दिल्यानंतरही महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकात आल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्याची माहिती बोम्मई यांनी दिली.
महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी चर्चा करून तुमच्या मंत्र्यांना इथे पाठवू नका असे आवाहन करणार आहे. याबाबत आम्ही आधीच मुख्य सचिवांद्वारे पत्र पाठवले आहे. मंत्र्यांनी बेळगावात येण्यासाठी ही योग्य वेळ नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ शकते, असे बोम्मई पत्रकारांशी बोलताता सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.