"राज्यपालांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा"; उदयनराजे भोसले यांची टीका
सातारा : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी "स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती", असं विधान केलं. त्यावरून वाद चालू असताना सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी "एका महिलेसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केली", असं वक्तव्य केलं. हे वाद ताजे असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. यावरून भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची पदावरून हकालपट्टी करून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात किंव्हा वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये करावी, अशा शब्दात सडकून टीका उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
साताऱ्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राज्यपालांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. " त्यांचं वय पाहता त्यांना वृद्धाश्रमात पाठवायला हवं. पण त्यांना वृद्धाश्रमात घेतील की नाही? याबाबत शंका आहे. कारण ते तिथेही काहीतरी वाद-विवाद निर्माण करतील. त्यामुळे त्यांची तेथूनही हकालपट्टी होईल", असं उदयनराजे भोसले म्हणालेत. पुढे ते म्हणाले, "वृद्धाश्रमाव्यतिरिक्त आता फक्त एकच ठिकाण उरतं, जिथे त्यांना पाठवता येऊ शकतं, ते म्हणजे वेड्यांचं रुग्णालय. कारण वेड्यांना तिथेच ठेवलं जातं. त्यांच्या विधानावरून त्यांना वेडेच म्हणावं लागेल. 'उचलली जीभ लावली टाळ्याला' या म्हणीप्रमाणे ते कुठेही काहीही बोलतात. त्यांना नेमकी मस्ती कशी आली? आणि त्यांच्या असं बोलण्याचं नेमकं कारण काय? हेच मला कळत नाही."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.