अभिनेता सयाजी शिंदे, मधुकर फल्लेंकडून फसवणूक
अभिनेते सयाजी शिंदे यांनी चित्रपटात काम करतो, असे सांगून पैसे घेतल्यानंतरही काम न करता व परत पैसे माघारी न देता फसवणूक केल्याचा आरोप वाई येथील चित्रपट निर्माते शिवाजी उर्फ सचिन बाबूराव ससाणे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला. मधुकर फल्ले यांच्याकडेही रक्कम दिली असल्याचे ससाणे यांनी म्हटले असून याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून संबिंधतांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी श्री. ससाणे यांनी केली आहे.
सचिन ससाणे म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी चित्रपट करायचा असल्याचे ठरवून त्यासाठी अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांना घेण्यासाठी शिंदे यांचे सहकारी मधुकर फल्ले यांच्यासोबत चर्चा केली. प्रत्यक्ष भेटीगाठी झाल्यानंतर सयाजी शिंदे यांनाही चित्रपटाची स्क्रीप्ट सांगण्यात आली. कामाचा मोबदला म्हणून प्रती दिवस 1 लाख रुपये घेणार असल्याचे ठरले. पाच दिवसांचे काम असल्याने त्या बदल्यात रोख 4 लाख रुपये व 1 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. पैसे देताना सयाजी शिंदे यांनी व्हाउचरवर सह्या केल्या आहेत. मात्र व्यवहाराबाबत कॉन्ट्रॅक्ट झाले नसल्याची माहिती ससाणे यांनी दिली. चित्रपटाचे काम सुरु झाल्यानंतर मात्र स्क्रीप्टमध्ये सयाजी शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात बदल करण्यास सांगितले. ही बाब पटली नाही.
यातूनच पुढे सयाजी शिंदे यांनी चित्रपटात काम करणार नसल्याचे सांगितले व 5 लाख रुपये परत देतो, असे सांगितले. याबाबतचे मोबाईलवरील संभाषणाचे रेकॉर्डिंग असल्याचे ससाणे यांनी सांगितले. मात्र पैसे देतो असे सांगूनही सयाजी शिंदे व मधुकर फल्ले पैसे देत नसल्याने दि. 1 डिसेंबर रोजी वाई पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुध्द तक्रार अर्ज देण्यात आला. पोलिस अद्याप गुन्ह्या दाखल करत नसल्याने रविवारी ससाणे यांनी पत्रकार परिषद घेवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान याबाबत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सातारा शाखेच्यावतीने जिल्हा पोलिस प्रमुखांना पत्र देण्यात आले असून याप्रकरणातील संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ससाणे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे : सयाजी शिंदे
सचिन ससाणे यांना आमच्याकडून कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ससाणे यांच्या तक्रारीत तथ्य नसून ते जनमानसात नाहक माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत आम्ही कायदेशीर मार्ग स्विकारला असल्याची प्रतिक्रिया अभिनेते सयाजी शिंदे यांनी दै. प्रभातशी बोलताना दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.