सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा उधळून लावणार. मनसे नेता आक्रमक...
राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या सुषमा अंधारे यांनी आधी माफी मागावी. अन्यथा त्यांची महाप्रबोधन यात्रा आणि त्यातली सभा उधळून लावू, असा इशारा मनसे नेत्याने दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांची उद्या उस्मानाबाद येथे जाहीर सभा आहे. मात्र आधी माफी मागा, अन्यथा तुमची सभाच उधळून लावू, असा इशारा मनसेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गपाट यांनी इशारा दिला आहे.
ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे आता मनसैनिकांची, राज ठाकरेंची माफी मागतात का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. त्यांनी माफी मागितली नाही तर सभास्थळी मनसैनिक गोंधळ घालण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. उद्या सायंकाळी 6 वाजता अंधारे यांची उस्मानाबाद येथे सभा आहे. मनसेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गपाट यांनी इशारा दिला आहे. राज ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरले वरून मनसे आक्रमक झाली असून माफी मागायची मागणी केली आहे.
सभेचं ठिकाण काय?
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त राज्यभर दौरे करत आहेत. आज 5 डिसेंबर रोजी त्या उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे येणार आहेत. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतील.
त्यानंतर सायंकाळी 6 वाजता उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात जाहीर महाप्रबोधन सभा होईल. आज रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला पुतळ्याला अभिवादन व कॅन्डल मार्च होणार आहे. उद्या 6 डिसेंबर 2022 रोजी उस्मानाबाद येथे दुपारी पदाधिकारी यांच्या भेटीगाठी व चर्चा होती. तर सध्याकाळी 5.30 वाजता नेहरु चौक आझाद चौक, उस्मानाबाद येथे जाहीर महाप्रबोधन सभा आयोजित करण्यात आली आहे.
उद्याच्या या सभेसाठी मनसे नेत्याने हा इशारा दिला आहे. या सभेला खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, राज्य विस्तारक युवा सेना शरद कोळी तसेच केशव ऊर्फ बाबा पाटील उपस्थित राहणार आहेत.
राज ठाकरेंवर काय टीका?
मुलुंड येथील सभेत बोलताना सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर टीका केली. आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे. त्याचा उठ दुपारी आणि घे सुपारी… असाच कार्यक्रम असतो. असं म्हणत सुषमा अंधारे यांनी टीका केली होती. 1 डिसेंबर रोजी त्यांनी हे वक्तव्य केलं.
ते अचानक गुहेतून बाहेर येतात. अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात, अशी टीका सुषमा अंधारे यांनी नाव न घेताच केली होती.. यावरून राज्यभरातील मनसे नेते आक्रमक झाले आहेत. उस्मानाबादमधील पदाधिकाऱ्याने सुषमा अंधारे यांना थेट इशारा दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.