'महाराष्ट्र पेटला तर सरकारला भारी पडेल' - संजय राऊत
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आता चिघळला आहे. बेळगाव हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक आणि दगडफेक केली. त्याचे जशास तसे उत्तर स्वारगेट (पुणे) बस स्थानकात कर्नाटकच्या गाड्यांना काळे फासून शिवसेनेने दिले आहे. त्यामुळे शिवसेनेने कर्नाटकसोबत आता रस्त्यावरील लढाईला आरंभ केला आहे. त्यावर शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या विषयावर महाराष्ट्र जर पेटला, तर सरकारला भारी पडेल, असे संजय राऊत म्हणाले.
या विषयावर महाराष्ट्र जर का पेटला, तर राज्य सरकारला भारी पडेल. कर्नाटकचे नंतर पाहू, आधी राज्य सरकारला जाब विचारू. राज्य सरकार मूग गिळून, डोळे मिटून बसले आहे. त्यांना स्वाभिमान, अभिमान, लोकभावना या गोष्टी माहीत आहेत का? की सर्व खोक्यात वाहून गेले?, अशी आगपाखड राऊत यांनी केली. तसेच पुण्यात कर्नाटकच्या विरोधात पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या शिवसैनिकांना शिंदे सरकारचे पोलीस लाठ्याकाठ्यांनी बदडतात. तुम्ही कोणाचे काम करत आहात? तुमच्या अंगात जर मराठी रक्त असेल, तर तुम्ही शिवसैनिकांना रोखू नका, असे माझे महाराष्ट्र पोलिसांना आव्हान आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठे आहेत? त्यांचे चाळीस आमदार कुठे आहेत?
त्यांनी अगोदर बेळगावला गेले पाहिजे. आमच्या सार्वजनिक संपत्तीचे नुकसान बेळगावात सुरू आहे. मुख्यमंत्री कुठे भूमिगत झाले आहेत, असे यावेळी राऊत म्हणाले. राज्यात अत्यंत दुर्बल, लाचार आणि कमकुवत सरकार आहे. या सरकारला पाय नसून खोके आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे पाणी रोखण्याचे काम कर्नाटक करत आहे. यापूर्वीही त्यांनी असे केले होते. त्यांना शिवसेनेने चोख उत्तर दिले होते. आजही शिवसेना त्यांना उत्तर देईल, असेही राऊत म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.