जे. जे. रुग्णालयात सापडले भले मोठे भुयार...
मुंबई : जे. जे. रुग्णालय परिसरातील डी.एम. पेटिट या १३० वर्षे जुन्या असलेल्या इमारतीत भुयार सापडले आहे. याठिकाणी नर्सिंग महाविद्यालय असून, भुयार सापडल्याने रुग्णालय परिसरातील कर्मचाऱ्यांत कुतूहल निर्माण झाले आहे. भुयाराची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आली आहे.
रुग्णालय परिसराची नियमित पाहणी करणारे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण राठोड बुधवारी पाहणी करीत असताना त्यांना सध्या ज्याठिकणी नर्सिंग कॉलेज आहे तिथे काही तरी असल्याचा संशय आला. त्यांनी त्यावरील झाकण उघडून पाहिले, तर लांबलचक पोकळी असलेला भाग दिसला.
कुतूहल म्हणून त्यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावून आणखी पाहणी केली असता भुयार आढळले. आणखी पाहणी केली असता डी.एम. पेटिट इमारत ते मुटलीबाई इमारत, असे २०० मीटरचे हे भुयार असून, ते तीन भागांत विभागल्याचे निदर्शनास आले.
१८४५ साली रुग्णालय खुले
सर जे. जे. रुग्णालय १८४५ साली रुग्णांसाठी खुले करण्यात आले. त्याचदरम्यान वैद्यकीय शिक्षणासाठी ॲन्ट मेडिकल कॉलेजही सुरू करण्यात आले. या रुग्णालय परिसरात ब्रिटिशकालीन अनेक जुनाट इमारती आहेत. त्यातील अनेक इमारतींना हेरिटेज वास्तूचा दर्जा देण्यात आला आहे.
भुयारासंदर्भातील सर्व माहिती, तसेच पुढे काय करायचे, अशी विचारणा जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वीच सेंट जॉर्ज रुग्णालयात अशा पद्धतीचे भुयार सापडले होते.
-डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.