Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुरोगाम्यांनो इतकेपण सनातनी होवू नका !

पुरोगाम्यांनो इतकेपण सनातनी होवू नका !



परवा सुधा मुर्ती सांगलीत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्या होत्या. या प्रसंगी त्यांची व शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंची भेट झाली. त्या भिडेंच्या पाया पडल्या आणि राज्यभरात वादंग उभे राहिले. माध्यमात सर्वत्र तीच चर्चा होती. यात मेहता प्रकाशनाच्या योजना यादव यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावे  लागले. त्या सदर कार्यक्रमाच्या संयोजनातला एक भाग होत्या. म्हणून त्यांनी या प्रसंगाची दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात त्या म्हणाल्या की, भिडे भेटायला आले होते, भेटीसाठी आग्रही होते व सुधा मुर्ती भेट द्यायला तयार नव्हत्या. पोलिसांनी मध्यस्ती केली. सुधा मुर्ती भिडेंना ओळखत नाहीत पण भिडे समर्थकांच्या आग्रहाने अखेर त्यांनी भिडेंना भेट दिली असे योजना यादव यांनी म्हंटले होते. योजना यादव यांच्या या खुलाशावर भिडे समर्थकांचे पित्त खवळलेच पण पुरोगामी गँगही भडकली. त्यांनीही योजना यादव यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले. ट्रोलिंगच्या त्रासाने योजना यादव यांनी फेसबुकचे खातेच बंद केले. नंतर योजना यादव यांनी जे मांडले होते तेच सुधा मुर्तींनी सांगितले. या सगळ्या प्रकरणात योजना यादव यांना प्रचंड ट्रोल केले गेले. दोन्ही बाजूंनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवली गेली. हा एकुण प्रकारच झुंडशाहीसारखा वाटला.

भिडे समर्थकांची आगपाखड समजता येते पण पुरोगाम्यांनी इतके कडवट व्हावे, इतके सनातनी व्हावे ? हे काही हजम होत नाही. प्रतीगामी तालिबान्यांना विरोध करता करता तालिबानी प्रवृत्तीचेच झाले आहेत. मुस्लीम धर्मांध आणि प्रतीगामी यांच्यात गुणात्मकदृष्ट्या काही फरक नाही. दोघेही एकाच प्रवृत्तीचे आहेत. आता याच ओळीत स्वत:ला पुरोगामी समजणारेही जाऊन बसणार काय ? प्रतीगाम्यांना विरोध करता करता ते ही प्रतीगाम्यांच्या वळणावर निघालेत की काय ? असा प्रश्न या निमित्ताने पडतो. केवळ योजना यादवच नाही तर अनेक प्रकरणात पुरोगाम्यांची कडवटता जाणवते आहे. पुरोगामी आणि प्रतीगामी या दोन्ही विचारांपेक्षा मानवता महत्वाची आहे, माणूसपण महत्वाचे आहे. प्रतीगाम्यांनी हे माणूसपण पायदळी तुडवलं. त्यासाठी ते माणसाच्या जीवावर उठले. कुठलाच विचार हा माणसापेक्षा मोठा नाही. सुधा मुर्ती भिडेंच्या पाया पडल्या. भिडेंचं व्यक्तीमत्व वादग्रस्त आहे हे खरं आहे. पण त्यासाठी इतका आकांडतांडव करण्याची काय गरज ? सुधा मुर्ती समाजातील एक प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व आहे. त्यांनी काय करावं ? कुणाच्या पाया पडावं, कुणाच्या नाही पडावं ? 

हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या व्यक्तीगत अधिकारावर तुमचे अतिक्रमण का ? बरं त्या काही संविधानिक पदावर नाहीत. त्या पुरोगामी चळवळीच्या प्रणेत्या नाहीत. त्यांनी भिडेंच्या विरोधात ना कुठली मोहीम उघडली होती, ना एल्गार पुकारला होता. ती मोहीम व तो एल्गार विसरून त्या पाया पडल्या अशातलाही काही भाग नाही. भिडे वयाने जेष्ठ आहेत. जेष्ठाला मान देण्याची संस्कृती आपल्याकडे आहे. त्यानुसार त्या पाया पडल्या. यात सुधा मुर्ती चुकल्या, त्यांनी खुप मोठ पाप केलं असं काय आहे ? विरोधी विचारांच्या व्यक्तीचाही माणूस म्हणून आदर असायला हवा. सदर व्यक्तीच्या विचाराला विरोध ठिक आहे पण त्या व्यक्तीचाच टोकाला जावून तिरस्कार, द्वेष करणे कितपत योग्य आहे. विचार जरी विरोधी असले तरी दोन्ही बाजूत संवाद का असू नये ? दोन्ही बाजूच्या लोकांच्यात मोकळेपणा का असू नये ? एकमेकांसमोर आल्यावर परस्परांना नमस्कार का करू नये ? एकमेकांशी मोकळेपणाने का बोलू नये ? विचार वेगळे आहेत म्हणून टोकाचा तिरस्कार करणे, आगपाखड करणे यातून हिंसाच जन्माला येते. यातूनच माणसांचे मुडदे पाडणारी प्रवृत्ती जन्म घेते. मुस्लीम धर्मांधांनी, सनातन्यांनी आजवर हेच केले. त्यांनी विरोधातला विचार समजून घेतलाच नाही. जे विरोधात गेले त्यांचा टोकाचा द्वेष व  टोकाचा तिरस्कार करत त्यांना संपवण्याचे काम केले. हे दोघेही एकाच लायकीचे आहेत. पण जे स्वत:ला पुरोगामी समजतात त्यांनी संवादी असायला काय हरकत आहे ? विरोधी विचाराच्या माणसाचा विचार नका स्विकारू पण माणूस म्हणून तरी त्याचा आदर करायला हवा. दोघांच्यामध्ये असणारी आदराची भिंत जेव्हा पाडली जाते तेव्हा मानवता नेस्तनाबूत होते.  कट्टरता आणि आंधळेपणा जन्माला येतो. माणसाचे व मानवतेचे मुडदे पाडले जातात. त्यामुळे विचारांची कट्टरता सोडून माणूसपणाला महत्व द्यायला हवे. आजवर या देशाचे सोवळ्यांनी प्रचंड नुकसान केले आहे. आता नव्याने विचारांचे कट्टर सोवळे मानवतेला व भारताला परवडणारे नाहीत. 

सुधा मुर्तींना व योजना यादव यांना ट्रोल करणारे जर इतकेच त्यांच्या भूमिकेशी ठाम आहेत तर त्यांनी माजी मंत्री विश्वजीत कदम यांना का दुर्लक्षित केले ? विश्वजीत कदम भिडेंच्या दुर्गा दौडीत मशाल घेवून सहभागी झाले होते. पेहरावासकट त्यांनी सदर कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. राजकारणातले अनेक मात्तबर व जबाबदार लोक भिडेच्या पाया पडतात, त्यांना पाठबळ देतात तेव्हा यातले कुणी पुरोगामी विश्वजीत कदमांना किंवा इतर कुठल्या नेत्यांना ट्रोल करायला का पुढे येत नाहीत ? हा दुजाभाव का व कशासाठी ? योजना यादव यांना ज्या पध्दतीने ट्रोल केले ते भयंकर होते. या ट्रोलिंगचा मनस्ताप जर त्यांना नाही पेलला तर ? त्यांनी त्या कार्यक्रमाचा हिस्सा म्हणून दुसरी बाजू मांडली असेल. त्यावर त्यांना इतकं ट्रोल करणार का ? त्यांनी स्वत:चे फेसबुक खाते बंद करावे, त्यांनी स्वत:चा मोबाईल बंद ठेवून बसावे इतकी वैचारिक दहशत निर्माण करणे योग्य नाही. मनोबल जर सशक्त नसेल तर अशा काळात माणूस काहीही करू शकतो. सामाजिक बदनामी व अप्रतिष्ठेच्या न्युनगंडापोटी काहीही घडू शकते. त्यामुळे विचारांचा इतका कडवेपणा योग्य नाही. संसदेत मोदी गँगला ताकदीने भिडणा-या सिने अभिनेते व खासदार अमोल कोल्हेंनाही असेच ट्रोल केले. माणूस बदलत असेल तर त्याला वेळ द्यावा, त्याचा थोडा थोडा बदलही स्विकारावा. लगेच शंभर टक्के पुरोगामी असल्याचे सर्टीफिकेट सादर करण्याची शासकीय मानसिकता योग्य आहे का ? 

सनातन्यांची मानसिकता स्पष्ट आहे. त्यांची वैचारिक उंचीही स्पष्ट आहे, ते तसेच वागणार. किमान पुरोगाम्यांनी तरी अधिक जबाबदारीने वागायला हवे. प्रतीगाम्यांच्या कचाट्यातून निसटणा-या लोकांशी संवाद ठेवायला हवेत. त्यांच्या सोबतचे संवाद वाढवायला हवेत. धार्मिक कट्टरतेतून मोकळा श्वास घेवून चांगलं जगता येते. मानवतेचा विचार अधिक नेटाने पुढे नेता येतो. मानवता हिच अंतिम आणि सर्वश्रेष्ठ आहे याचा त्यांना दिलासा व विश्वास द्यायला हवा. पण असे होताना दिसत नाही. प्रतीगामी त्यांचा धर्मांध विचार रूजवण्यासाठी जेवढे लवचिक होतात, संवाद साधतात तेवढी लवचिकता पुरोगामी दाखवत नाहीत. तेवढा संवाद पुरोगामी ठेवत नाहीत. बुध्दीमत्तेचा सनातन माज पुरोगाम्यांच्यातही ठासून भरलेला दिसतो आहे. 

आम्हीच कट्टर पुरोगामी, फक्त आम्हीच बुध्दीवादी या मानसिक रोगात पुरोगामी जमात अडकल्याचे दिसते आहे. आमचेच पुरोगामीत्व अस्सल आहे बाकीचे कमअस्सल आहेत या भ्रमापोटी इतरांना कमी लेखण्याचे, त्यांच्यावर तुटून पडण्याचे उपदव्याप हल्ली पुरोगाम्यांच्यात खुप होतायत. याच अनेक पुरोगाम्यांनी टोळकी केलेली आहेत. यात काही टोळकी जातीची आहेत, काही टोळकी सांप्रदायिक आहेत. सांप्रदायिक म्हणजे चळवळीतल्या विविध महापुरूषांचे समर्थक असणारी. महात्मा फुले यांना मानणा-या पुरोगाम्यांचा वेगळा गट, शाहू महाराजांना मानणा-या पुरोगाम्यांचा वेगळा गट, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणा-या पुरोगाम्यांचा वेगळा गट, शिवाजी महाराजांना मानणा-या पुरोगाम्यांचा वेगळा गट, दाभोळकरांना मानणा-या पुरोगाम्यांचा वेगळा गट. असे बरेच पुरोगामी सांप्रदाय आहेत. या विविध गटात समन्वय असल्याचे दिसत नाही.  त्यातही काही जातीचे आणि काही मतीचेही पुरोगामी आहेत. समाजवादी पुरोगामी, ब्राम्हण पुरोगामी, मराठा पुरोगामी, दलित पुरोगामी, ओबीसी पुरोगामी असेही गट-तट आहेत. या सगळ्या पुरोगाम्यांनी स्वत:ला सनातन्यांच्या पंगतीत उभे करू नये. पुरोगामी म्हणजे सतत प्रगतशिल असणे, पुढे पुढे जाणे. पुरोगामीत्वाची व्याख्या अशीच असेल तर पुरोगाम्यांनी सनातनी मानसिकता व मानवतेला संकुचित करणारी आकड ठेवणे योग्य नाही.

संपादक वज्रधारी दत्तकुमार खंडागळे


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.