Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिवसेना नेते सुधीर सुरी हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी करणार

शिवसेना नेते सुधीर सुरी हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी करणार


शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्या हत्येचा तपास एसआयटी करणार करणार आहे. अमृतसरचे पोलिस आयुक्त (CP) अरुण पाल सिंह यांनी याबाबतची माहिती दिली आहे. एसआयटी आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. पंजाबमधील अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांची शुक्रवारी म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर अनेक ठिकाणी निदर्शने झाली. शिवाय सुरी यांच्या कुटुंबीयांनी देखील आरोपींना अटक केल्याशिवाय सुधीर यांच्यारव अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका घेतली. मात्र, पोलिसांच्या आश्वासनानंतर कुटुंबीयांनी रविवारी सुरी यांच्या अंत्यसंस्कार केले.

अरुण पाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर सुरी हत्या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन आम्ही SIT स्थापन केली आहे. ज्यांची नावे या प्रकरणात येतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे निर्देश एसआयटीला देण्यात आले आहेत. आरोपी संदीप सोनीवर सोशल मीडियाचा प्रभाव होता. सोशल मीडियावर व्हिडिओ पाहूनच संदीप याने हे कृत्य केले आहे. 4 नोव्हेंबरला अमृतसरच्या मजिठा रोडवरील गोपाल मंदिराबाहेर निदर्शनादरम्यान सुरी यांच्यावर गोळीबार झाला होता. सुधीर सूरी यांना दोन गोळ्या लागल्या होत्या. या घटनेनंतर सुरी यांना लगेच रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सुधीर सुरी यांच्यावर दोन हल्लेखोरांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर पोलिसांनी संदीप या एका आरोपीला अटक केली होती. त्याचा एक साथीदार फरार झाला असून हल्लेखोर संदीपकडून पोलिसांनी परवाना असलेले पिस्तूल जप्त केले आहे. न्यायालयाने या खून प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यासोबतच सुरी यांच्या घराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेना नेते सुधीर सुरी यांचे कुटुंब अंत्यसंस्कारासाठी तयार नव्हते. परंतु जिल्हा प्रशासनाने कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि सुरक्षिततेचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबाने अंत्यसंस्कार करण्यास होकार दिला आणि आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, ज्या सुधीर धुरी यांची हत्या झाली त्यांच्याशी काही संबंध नसल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय. पण तरीही पंजाबमध्ये अशा अनेक संघटना शिवसेना नावानं आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल 15-16 शिवसेना एकट्या पंजाबमध्ये आहेत. मागच्या सहा महिन्यांपूर्वीही दोन धार्मिक गटातील वादात पंजाबमधल्या शिवसेनेचं नाव समोर आलं होतं. पतियाळामध्ये त्यावरून हिंसाही झाली होती. त्यानंतर पंजाब पोलिसांनीच शोध घेतला तर त्यांच्या लक्षात आलं की अशा अनेक संघटना, त्यातल्या काही तर नोंदणीकृत नाहीत. पण त्या सगळ्या शिवसेनेच्या नावानं चालतायत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.