Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद पवार यांचा हल्लाबोल....

शरद पवार यांचा हल्लाबोल....


देशातील जनतेला एकसंध ठेवणे, त्यांच्याबाबत कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करण्याची शपथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. मात्र, त्या शपथेनुसार त्यांची वागणूक दिसून येत नाही. त्यांना या शपथेचा विसर पडला आहे. केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून सत्ता काबीज करण्याचे प्रकार सत्ताधीशांकडून सध्या सुरू असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील उद्योग सरकारच्या डोळ्यादेखत गुजरातला गेले ही लाजिरवाणी गोष्ट असल्याची टीकाही त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱयांच्या दोनदिवसीय मंथन शिबिराच्या समारोपप्रसंगी शरद पवार बोलत होते. यावेळी पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार हे मुंबईतील रुग्णालयात दाखल आहेत. तरीही त्यांनी मंथन शिबिराच्या समारोपाला हजेरी लावली. भाषणाची सुरुवात शरद पवार यांनी केली. त्यानंतर त्यांचे भाषण आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी वाचून दाखविले.

शरद पवार म्हणाले, पंतप्रधानपदावरील व्यक्तीकडे सर्वसमावेशक विकासाची दृष्टी आणि विचारांची व्यापकता असावयास हवी; परंतु दुर्दैवाने सध्या तसे दिसत नाही. एका राज्यातील प्रकल्प दुसऱया राज्याकडे पळविण्यात येत आहेत. वेदांता-फॉक्सकॉननंतर टाटा-एअरबससारखा भव्य प्रकल्प राज्यातून गुजरातकडे वळवण्यात आला. राज्यातील सध्याच्या सरकारच्या डोळ्यांदेखत हे प्रकल्प गेले ही लाजिरवाणी गोष्ट आहे. टाटा-एअरबसचा हवाई प्रकल्प हलवण्यापेक्षा केंद्रातील सरकारने देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प कार्यक्षम कसे करता येईल याकडे लक्ष द्यायला हवे होते. चीनविरुद्ध युद्धात पराभव झाल्यानंतर देशाचे वायुदल शक्तिशाली करण्यासाठी रशियन तंत्रज्ञानाची मदत घेऊन मिग लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी हिंदुस्थानातील बंगळुरू, नाशिक आणि लखनौ अशा तीन ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आले. तत्कालीन नेतृत्वाने असा व्यापक विचार त्यावेळी केला होता. आज या प्रकल्पांची अवस्था बिकट आहे. मिग विमाने तयार करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान व कुशल मनुष्यबळ उपलब्ध असताना या प्रकल्पांकडे ऑर्डर्स नाहीत, नवीन काम नाही. पंतप्रधानांनी या तीनही प्रकल्पांना उर्जितावस्था आणण्यासाठी कष्ट घेतले असते, तर त्याचे मी स्वागत केले असते.

आणखी 10-15 दिवस आरामाचा सल्ला

शरद पवार म्हणाले, या शिबिरात मी सगळ्यांची भाषणे ऐकली असे नाही, पण बहुतांश भाषणे ऐकण्याची संधी मिळाली. सविस्तर बोलायला आणि भाषण करायला आज मला शक्य नाही. वैद्यकीय अधिकाऱयांनी मला आणखी 10 ते 15 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर मला नियमित काम सुरू करता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचा लहान-थोर कार्यकर्ता पूर्ण ताकदीने हा पक्ष मजबूत करण्यासाठी लढत आहे, हा संदेश या शिबिरातून जाईल. स्वतःच्या ताकदीवर, हिंमतीवर महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची हिंमत आणि ताकद तुम्हा सर्वांमध्ये आहे. ही संधी लवकरच मिळेल.

पंतप्रधानांनी कमकुवत झालेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यायला हवे

पंतप्रधानांनी आपले अधिक लक्ष कमकुवत होत चाललेल्या अर्थव्यवस्थेकडे आणि महागाईसारख्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे द्यायला हवे. सुदैवाने या वर्षी देशात चांगला पाऊस पडला आहे. शेतकऱयांच्या घामातून आणि निसर्गाच्या कृपेने पिकांचे भरघोस उत्पादन झाले आहे. अन्नधान्याच्या बाबतीत देश केवळ स्वयंपूर्ण न राहता जगाच्या पाठीवरील अनेक देशांतील भुकेची गरज भागवणारा देश ओळखला जाऊ लागला आहे. शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा विस्तार होऊन पुण्याजवळील हिंजवडी, नाशिक वगैरे भागात तरुण पिढीसाठी रोजगाराची नवी दालने उघडली गेली आहेत. राज्यातील आणि देशातील नेतृत्वाने यापासून बोध घ्यायला हवा. विकास घडवायचा असेल, तर मर्यादित विचार करायचा नसतो. देशातील महिला, कष्टकरी, शेतकरी, कामगार, आदिवासी, मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांमध्ये देशाला समृद्ध करण्याची धमक आहे. मात्र, त्यांना प्रोत्साहित करणारे सत्ता, धर्म, जात, पक्ष यांच्या पलीकडे जाऊन विचार करणारे नेतृत्व हवे. अशी विशाल दृष्टी देशातील आणि राज्यातील नेतृत्वामध्ये नाही, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.

संकुचित सत्ताधाऱयांमुळे राज्य अधोगतीला जाऊ शकते

महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे, संस्कृती देणारे आणि विचार देणारे राज्य आहे. मात्र, संकुचित सत्ताधाऱयांमुळे राज्य अधोगतीला जाऊ शकते. ते आपल्याला होऊ द्यायचे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पुरोगामी विचार नव्या पिढीत रुजवायचा आहे. बाबरी मशीद पाडल्यानंतर देशातील सामाजिक सलोखा बिघडत गेला. त्याचा लाभ भाजपने उठविला. काही राज्यांत आणि त्यानंतर देशात भाजपची सत्ता आली. सुरुवातीला अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे सुसंस्कृत नेतृत्व मिळाले. मात्र, 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नेतृत्व आले. पंतप्रधानपदाची जी शपथ दिली जाते, त्यात मोठी जबाबदारी असते. मात्र, सध्या याचा विसर पडल्याचे दिसून येते. केंद्र आणि राज्यांच्या धोरणांत अंतर असू शकते. याचा एकमेकांनी मान राखला पाहिजे. मात्र, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राज्यांतील नेतृत्वावर हल्ला करून सत्ता काबीज करण्याचे प्रकार केंद्रातील सत्ताधीशांकडून सध्या सुरू आहेत. विकास घडवायचा असेल, तर मर्यादित दृष्टिकोन ठेवून चालत नाही, असेही शरद पवार म्हणाले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.