Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पालघरमधील दोघांकडून आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त..

पालघरमधील दोघांकडून आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त..


ठाणे गुन्हे शाखेने आज बनावट नोटा प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख चौपाटी येथे पालघरच्या दोन व्यक्तींकडून तब्बल दोन हजार रुपयाच्या नोटांचे 400 बंडल असे एकूण आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात यश आले आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड गायमुख चौपाटी येथे दोन इसम इनोव्हा कारमधून बनावट भारतीय चलनी नोटा छापून त्याची विक्री करण्याकरता येणार असल्याची गुप्त माहीती ठाणे गुन्हे शाखा घटक 5चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ पथक तयार करून गायमुख चौपाटी येथे सापळा लावला. सकाळी 10.40 वाजायच्या सुमारास इनोव्हा कार क्र.एम.एच.04 डीबी 5411 मधून आलेल्या संशयित राम हरी शर्मा (वय 52 वर्षे) रा.विरार आणि राजेंद्र रघुनाथ राऊत (वय 58 वर्षे) रा.कुरगाव बोईसर या दोन इसमाना ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये दोन हजार रूपयाच्या वेगवेगळ्या नंबरच्या नोटा असलेले 400 बंडल, असे एकूण आठ कोटी रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा आढळून आल्या.

याबाबत ताब्यात घेतलेल्या दोन इसमांकडे चौकशी केली असता बनावट नोटा मदन चौहान याच्या मदतीने पालघर येथील गोडावूनमध्ये छापून त्या विक्री करता आणल्या असल्याचे आरोपींनी कबुल केले. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 373/2022 भा.द.वि. कलम 489 (अ), 489 (ब), 489 (क), 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अरुण क्षीरसागर हे करत आहेत. यातील बनावट नोटा या आरोपी राम हरी शर्मा याच्या पालघर येथील टेक इंडस्ट्रियल इस्टेटमधील गाळ्यामध्ये संगणक आणि प्रिंटरच्या सहाय्याने छापल्या असल्याची अधिक माहिती आरोपींकडून मिळाली असून ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मुंबई-गुजरातमधून 317 कोटींच्या बनावट नोटा जप्त

काही दिवसांपूर्वी मुंबई आणि गुजरातमधून तब्बल 317 कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी मुंबई आणि गुजरातमध्ये सहा जणांना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणी मुंबईतून मुख्य आरोपी विकास जैन याला अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी विकास जैन याचा वेगवेगळ्या शहरात कुरियर फर्म चालवत होता. याच फर्मच्या माध्यमातून विकास जैन बनावट नोटांचं रॅकेट चालवत होता, अशी माहिती पीटीआयनं दिली आहे. मुंबई, आणंद, सूरत आणि जामनगर या चार शहरात विकास जैन मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचं रॅकेट चालवत होता. गुजरात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, विकास जैन या चार शहरातून देशभरात बनावट नोटा पाठवत होता. गुजरात पोलिसांना याचा सुगावा लागल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई केली. त्यांनी मुंबईतून विकास जैन याला बेड्या ठोकल्या तर अन्य पाच आरोपींना पाच शहरातून अटक केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.