ट्विटरचा 8 डॉलरच्या पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय मागे..
ट्विटर कंपनीने पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरवरील ब्लू टिकसाठीच्या पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय रद्द केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ट्विटरने पेड सबस्क्रिप्शन सेवा बंद केली आहे. ही सर्व्हिस सुरु झाल्यापासून बनावट अकाऊंटच्या संख्येत झपाट्याने वाढू लागली होती, त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ब्लू टिक विकत घेण्यासाठी आठ डॉलर मोजावे लागणार नाहीत.
ट्विटरची पेड ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा बंद
ॲप बनवणाऱ्या जेन मंचुन वोंग यांनी सांगितलं की, ट्विटरने 8 डॉलरच्या पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय मागे घेतला आहे. कंपनीतील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पेड सबस्क्रिप्शन सेवा सुरू झाल्यापासून ट्विटरवरील बनावट अकाऊंटची संख्या झपाट्याने वाढू लागली, ही बाब लक्षात घेऊन कंपनीने ही सेवा कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ट्विटर युजर्सने शुक्रवारी सांगितलं की, नवीन ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शन सेवा त्यांच्या iOS ॲपवरून अचानक गायब झाली. यानंतर युजर्स चांगलेच संतापले होते.
निर्णय का बदलावा लागला?
मीडिया रिपोर्टनुसार, पेड ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा सुरू होताच बनावट अकाऊंटची संख्या प्रचंड वाढली. कंपनीने आधी यावर आक्षेप घेतला नाही. पण गेल्या दोन दिवसांत फेक अकाउंटवरून आक्षेपार्ह ट्विट केले गेले, ज्यामुळे ट्विटरला हा निर्णय आता मागे घ्यावा लागला आहे. एका व्यक्तीने Nintendo Inc. नावाच्या प्रोफाईलवर पेड सबस्क्रिप्शनने निन्टेंडो इंक कंपनीच्या नावाने फेक अकाऊंटवर ब्लू टिक घेत सुपर मारिओचा फोटो पोस्ट करत आक्षेपार्ह ट्विट केलं. मोठी फार्मा कंपनी एली लिली अँड कंपनीच्या नावाने एका व्यक्तीने अकाऊंटवर ब्लू टिक घेतली आणि इन्सुलिन आता विनामूल्य असल्याचं ट्विट केले. इतकच नाही तर एका व्यक्तीने टेस्ला कंपनीचं बनावट अकाऊंट तयार करून या कंपनीच्या सेफ्टी रेकॉर्डची खिल्ली उडवली. ट्विटरचे मालक एलॉन मस्क हे टेस्ला कंपनीचेही सीईओ आणि मालक आहेत. अखेर या पेड सबस्क्रिप्शनचा गैरवापर केला गेल्याने ट्विटरने ही सेवा बंद केली आहे.
एलॉन मस्क यांची ट्विटर डील चर्चेत
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी अलिकडेच ट्विटर कंपनी खरेदी केली आहे. तेव्हापासूनच ट्विटर डील फार चर्चेत आहेत. शिवाय ट्विटरची मालकी मिळाल्यापासून मस्क त्यांनी घेतलेले अनेक मोठे निर्णय जगभरात चर्चेचा विषय राहिले आहेत. त्यांनी ट्विटर कंपनीमध्ये पदभार स्वीकारताच, सर्वात आधी ब्लू टिकसाठी 8 डॉलर शुल्क द्यावे लागणार ही घोषणा केली. यानंतर कंपनीने मोठ्या प्रमाणत कर्मचाऱ्यांना कामावरून हटवलं केली. त्यानंतर कंपनीने हाय-प्रोफाइल ट्विटर अकाऊंटसाठी ऑफिशिअल लेबल दिला. त्यानंतर तो हटवण्यात आला. आता जेव्हा बनावट अकाऊंटची संख्या वाढली, तेव्हा 8 डॉलरचं ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शन सर्व्हिस रद्द करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.