समृद्धी महामार्ग नागपूर ते शिर्डी टप्पा कधी सुरू होणार?
समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. हा टप्पा लवकरात लवकर सुरु करण्याचा प्रयत्न असून येत्या नोव्हेंबरपर्यंत हा मार्ग सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे आज गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे जाऊन चेकपोस्टवर पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्यासाठी नागपूर विमानतळावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी या पहिला टप्प्याचे लोकार्पण दिवाळीत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे वृत्त होते. मात्र, आता पुढील महिन्यात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. आता लोकर्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आपले पोलीस जीव धोक्यात घालून काम करीत असतात. त्यातल्या त्यात गडचिरोली जिल्ह्यात काम करणाऱ्या पोलिसांच्या प्राणाला क्षणोक्षणी धोका असतो. त्यातही ते उत्तम काम करीत आहेत. आपण त्यांच्यासोबत सण साजरे केल्याने त्यांचे मनोबल वाढते, लढण्याची उर्मी निर्माण होते. मी गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असतानाही दरवर्षी पोलिसांसोबत दिवाळी साजरी करीत होतो. आता मुख्यमंत्री आहे तरीही त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार आहे. त्यांच्यासोबत आनंद वाटून घेण्यासाठी मी भामरागडला जात आहे. पोलिसांचे मनोबल वाढल्याने गडचिरोलीमध्ये नक्षलवाद कमी होत चालला असल्याचा दावाही त्यांनी केला.
आमच्या कामांच्या गतीने विरोधकांना धडकी
नाना पटोले यांनी राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. याबाबत विचारले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी पटोलेंची मागणी हास्यास्पद असल्याचे म्हटले. आज राज्यात बहुमताचे, भक्कम पाठींबा असलेले सरकार स्थापन झाले आहे. तीन महिन्यांत आम्ही 72 मोठे निर्णय घेतले. ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप 397 जागांवर तर आमच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने 243 ग्रामपंचायतींवीर सरपंच निवडून आणले आहे. आताही इतर सरपंच येऊन भेटत आहेत. आकडा वाढतो आहे. त्यामुळे विरोधकांना धडकी भरली असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्ष टीका करतात, ते त्यांचे कामच आहे. पण आम्ही टीकेला टीकेने नव्हे तर कामाने उत्तर देऊ, असे ते म्हणाले.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नुकसान भरपाईसाठी हेक्टरची मर्यादा वाढवली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला पूर्व विदर्भात चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात पूर्व विदर्भाला स्थान मिळेल का, असे विचारले असता, केवळ पूर्व विदर्भच नव्हे तर सगळ्यांचाच विचार विस्तारात केला जाईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
राज ठाकरेंसोबत राजकीय चर्चा नाही...
दिवाळीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावले होते. दीपोत्सवासाठी आम्ही गेलो होतो. यावर्षी राज्यात सर्व सण आनंदाने साजरे होत आहेत. त्याचा आनंद आज राज्यभरात बघायला मिळतो आहे. ठाकरेंसोबत राजकीय चर्चा नव्हती, सण आणि उत्सव येवढ्याच विषयांवर त्यांच्याशी बोलणे झाले, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.