Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देवेंद्रजी, त्या उध्दव ठाकरेला मातोश्रीबाहेर हाकलून द्या !

देवेंद्रजी, त्या उध्दव ठाकरेला मातोश्रीबाहेर हाकलून द्या !


अखेर खुप चर्चा झालेले दसरा मेळावे पार पडले. शिवसेना नक्की कुणाची ? याचे उत्तर लोकांनीच दिले. महाशक्तीचा खेळ उघडा पडला. पण सत्तेचा दर्प असलेल्या व आम्ही कुणाचीही, कशीही वाट लावू शकतो असा माज असलेल्या लोकांना ते पचनी पडणार नाही. त्यांना जनतेचा कौल कळणार नाही. ते तो कौल समजून घेणार नाहीत. त्यामुळे ते उध्दव ठाकरे आणि शिवसेना नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न थांबवणार नाहीत. दसरा मेळाव्याला शिवतिर्थावर महाशक्तीचे वस्त्रहरण झाले. जनतेने ते उस्फुर्तपणे केले. बी के सी वर राज्यभरातून लोक गोळा करण्यात आले. लोकांना पैसे वाटून गोळा केले गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण चालू असतानाच अनेक लोक उठून गेले. रिकाम्या खुर्च्या डोळ्यात येत होत्या म्हणून तिकडे कँमेरे फिरवणे बंद केले. 

इकडे शिवाजी पार्कवरती लोक उस्फुर्तपणे आले होते. त्या मेळाव्यात जीवंतपणा होता. शिवसेनेतले नेते भाजपाच्या हाताला लागले आहेत पण सच्चा शिवसैनिक त्यांच्या हाताला लागलेला नाही आणि कधी लागणार नाही हे पुन्हा एकदा सिध्द झाले.  आपण कुणी महाशक्ती आहोत याची घमेंड व माज डोळ्यावर असलेल्या लोकांना हे असलं दिसणार नाही. ते अजून ताकदीने शिवसेना व उध्दव ठाकरे यांना संपवण्यासाठी प्रयत्न करणार हे नक्की. दसरा  मेळावा झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जी प्रतिक्रीया दिली ती बरेच काही सांगून जाते. शिमग्यावर काय बोलावं ? असं फडणवीस म्हणाले आहेत. त्यांचेही बरोबर आहे. शिमगा हा सण त्यांच्या आवडीचा दिसतो आहे. इडीच्या भितीने खुष मस्क-यांची पिलावळ गोळा करत राज्यभर कुणा-कुणाच्या नावाने शिमगा चालवलेल्या फडणवीसांना दुसरं काय आठवणार ? आयुष्यभर केवळ दुस-याच्या नावाने शिमगाच करतच ज्यांनी स्वत:चे राजकारण रेटले त्यांना शिमगा नाही आठवणार तर मग काय आठवणार ? हा खरा प्रश्न आहे. 

या एकूण प्रक्रियेत, बंडाळीत एकनाथ शिंदे हे एक प्यादे आहेत. त्यात त्यांचा फार महत्वाचा रोल नाही. ते बिच्चारे यांच्या हाती सापडलेत. त्यांचीच किव येते. कारण ते स्वत:च महाशक्तीच्या दबावाला बळी पडून बाहूले झाले आहेत. ते बाहूले नसते झाले तर त्यांना तुरूंगात जावे लागले असते. फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या त्रासाला कंटाळून जाहिर सभेत उध्दव ठाकरेंच्याकडे राजिनामा दिला होता त्या एकनाथ शिंदेंना एकाएकी महाशक्तीचा व हिंदूत्वाचा साक्षात्कार कसा होईल ? ही त्यांची मजबुरी आहे. बाकी सर्व करते करविते आहेत देवेंद्रपंत आणि त्यांचे दिल्लीतील बकासुरी सत्ताकांक्षी आणि मोघल प्रवृत्तीचे नेते. त्यांना देशातला विरोधक, विरोधातला आवाज पुरता नष्ट करावयाचा आहे. सत्तेच्या व संपत्तीच्या जोरावर सगळे पक्ष संपवण्याची त्यांची मानसिकता आहे. वेळोवेळी ते बोलूनही दाखवत आहेत. 

त्यातून शिवसेना त्यांना आव्हान देत असेल, त्यांची औरंगजेबी प्रवृत्ती अधोरेखित करत असेल तर ते शिवसेनेला बरबाद करण्यासाठी जीवाचे रान केल्याशिवाय सोडणार नाहीत. उध्दव ठाकरेंची माणसं फोडली. आता त्यांच्याकढून त्यांचा पक्ष,  पक्षाचे चिन्ह काढून घ्यायचे आहे. त्यांना सभेला मैदान मिळू द्यायचे नाही. भाजपाने असेच कारस्थान रचले होते. भाजपाच्या बुडात दम असेल तर त्यांनी लोकांच्यात जावे. लोकांच्यात जावून लोकशाही मार्गाने उध्दव ठाकरेंना घरी बसवावे. त्यांचे राजकारण संपवावे. पण लोकशाही मार्गाने संपवावे. कुणाला संपवायचे व कुणाला ठेवायचे ? याचा निवाडा लोकांना करू द्यावा. तो निवाडा करणारे, सत्तेच्या जोरावर विरोधी आवाज संपवू पाहणारे तुम्ही कोण ? 

भाजपने लोकशाहीचा गळा घोटून शिवसेना संपवण्याचे कारस्थान रचलेच आहे. त्यांनी शिवसेनेला खुषाल बरबाद करावे. उध्दव ठाकरेंचा पक्ष काढून घ्यावा, त्यांच्या पक्षाचे चिन्ह काढून घ्यावे. देवेंद्रजी आणि त्यांच्या औरंगजेबी प्रवृत्तीच्या दिल्लीश्वर नेत्यांचे इतक्याने समाधान नाही झाले तर त्यांनी उध्दव ठाकरेला मातोश्रीबाहेर हाकलून द्यावे. त्यांना महाराष्ट्राच्याबाहेर काढावे. तेवढ्याने जमत नसेल तर छत्रपती संभाजी राजाची जशी कातडी सोलली, डोळे काढले, नखे काढली, जिभ काढली तसे करावे. उध्दव ठाकरे जास्त बोलतात, उघड उघड औरंगजेबी सत्तेला आव्हान देतात. त्यांचे असेच हाल व्हायला हवे आहेत. त्यांचीही चमडी काढायला हवी, त्यांचे डोळे काढायला हवेत. मोदींना व अमित शहांना आव्हान देणारी त्यांची जिभ छाटायला हवी. 

त्या अवस्थेत त्यांना महाराष्ट्रभर फिरवायला हवे. असे केले तर पुन्हा कुणी विरोधाला समोर ठाकणार नाही. पुन्हा कुणी तुमच्या सत्ताकांक्षी प्रवृत्तीला ललकारणार नाही. पुन्हा कुणी मोदी-शहांना आव्हान देणार नाही. पुन्हा कुणी फडणवीसांचे मुख्यमंत्री पद काढून घेणार नाही. असे केल्याने किमान देवेंद्रजींचा कंड शांत होईल. त्यांची बदल्याची खाज शांत होईल. पण लक्षात ठेवा हा महाराष्ट्र आहे. तुम्हाला अजून महाराष्ट्र निट कळलेला नाही. सत्तेच्या घमेंडीत तुम्ही महाराष्ट्राला ओळखू शकला नाहीत. एखादा लाचार राधाकृष्ण विखे म्हणजे महाराष्ट्र नव्हे.  इतिहास अजून ताजा आहे. महाराष्ट्राला जिंकण्यासाठी औरंगजेबाने जंग जंग पछाडले त्या औरंगजेबाचे काय झाले ? हे अजून इतिहासातून पुसले नाही. तो इतिहास अजून जीवंत आहे. सत्तेच्या घमेंडीत तो इतिहास भाजपवाल्यांना स्मरत नाही.  

त्याचे भान राहिले नाही इतकेच. या महाराष्ट्राच्या मातीत अजूनही तीच रग तीच धग आहे. याच मातीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, इंग्रजी सत्तेला मातीत गाडणारे क्रांतीसिंह नाना पाटीलही याच मातीतले. अशी नररत्ने जन्माला घालणारी ही तिच माती आहे. तिची कुस अजून वांझ नाही झाली. इथं चार-दोन सुर्याजी पिसाळ भेटतील, चार-दोन लाचार बांडगुळ भेटतील पण अख्खा महाराष्ट्र लाचार होत नाही. महाराष्ट्र लढतो, महाराष्ट्र भिडतो, मस्तवाल औरंगजेबाला मातीत गाडतो हा इतिहास ताजा आहे. हा इतिहास फार लांबचा नाही. कुणी नेता नसताना महाराष्ट्र लढला आणि त्याने इथेच औरंग्याचे थडगे बांधले. महात्मा फुले लढले, राजर्षी शाहू महाराज लढले त्यांनी ब्राम्हण्यशाही उलथीपालथी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर लढले. त्यांनी ब्राम्हण्यशाहीचा माज उतरवला. मनूवादाच्या शवपेटीवर लोकशाहीचा दणकट खिळा ठोकला. हा सर्व इतिहास अजून ताजा आहे. मराठी माणसाच्या मनात या इतिहासाचा सुगंध आजही दरवळतो आहे.  सत्तेची मस्ती नाही उतरली तर मराठी जनता ती उतरवण्यास समर्थ आहे. याचे भान या नव्या औरंगजेबांनी जरूर ठेवावे.

दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, मो. 9561551006



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.