Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खोक्यांवरून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद पेटला...

खोक्यांवरून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद पेटला...


कडू यांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार, शिंदे-फडणवीस यांनाही नोटीस पाठवणार खोके सरकारसोबत असलेले अपक्ष आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात खोक्यांवरूनच जोरदार वाद पेटला असून कडू यांनी थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार देऊन रवी राणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

'बच्चू कडू हा तोडपाणी करणारा आमदार आहे. खोके मिळाल्यानंतरच तो गुवाहाटीला गेला होता,' असा सनसनाटी आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यानंतर मिंधे सरकारसोबत असलेल्या या दोन्ही आमदारांमधील वाद विकोपाला गेला आहे. कडू यांनी अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. 'रवी राणा यांनी माझी बदनामी केली आहे. राजकीय करीअर करायला मला वीस वर्षे खर्ची घालावी लागली आहेत. त्यामुळे मी पैसे घेऊन गुवाहाटीला गेलो असेन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या आरोपाला उत्तर द्यायला हवे,' असे कडू यांनी नमूद केले आहे. मला पैसे दिले गेले असतील तर स्पष्ट करा, अशी मागणी करणारी नोटीस मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठवणार, असेही कडू यांनी सांगितले.

दरम्यान, मंत्रीपद न मिळाल्याने बच्चू कडू आधीच नाराज आहेत. त्यात फडणवीस समर्थक रवी राणा यांच्या आरोपाने कडू यांचा पारा चांगलाच चढला असून खोके सरकारमधील खदखद येत्या काळात आणखी उफाळून येण्याचे स्पष्ट संकेत यातून मिळत आहेत.

…तर तुमच्या घरी भांडी घासेन

रवी राणा यांनी केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. गुवाहाटीला जाण्यासाठी मी पैसे घेतले असे ते म्हणत असतील तर त्याचे पुरावे त्यांनी द्यावेत. मी तोडपाणी केल्याचे सिद्ध झाले तर मी त्यांच्या घरी भांडी घासायलाही तयार आहे. त्यांनी 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्यावे, अन्यथा लढाई आरपारची होणार हे ध्यानात ठेवावे, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

खोके आणि ओके हाच पक्ष!

'मंत्रीपद सोडून असंच कुणी दुसरीकडे जातं का? बच्चू कडू गुवाहाटीला का गेला? याला कोणता पक्ष आहे? याचा पक्ष एकच 'खोके आणि ओके.' खोके घेतल्याशिवाय याचे पानही हलत नाही. हा खोके घेऊनच गुवाहाटीला गेला होता,' असा आरोप रवी राणा यांनी केला होता. 'बच्चू कडू नौटंकीबाज आहे. या टीनपाटाने गुवाहाटीला जाऊन आणि सत्ताधाऱयांची लाळचाटेगिरी करून जी संपत्ती जमा केलीय ती आधी गरीबांना वाटून दाखवावी ' असे आव्हानही राणा यांनी दिले होते. त्यावरून हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.