Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बोगस जात प्रमाणपत्र प्रकरण, नवनीत राणा यांच्यावर....

बोगस जात प्रमाणपत्र प्रकरण, नवनीत राणा यांच्यावर....


बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. शिवडी महानगर न्यायदंडाधिकाऱयांनी राणा यांच्याविरुद्ध बजावलेले अजामीनपात्र अटक वॉरंट पोलिसांनी थांबवले कसे? असा प्रश्न उपस्थित करीत मूळ तक्रारदार जयंत वंजारी यांनी मंगळवारी राणा यांच्या बोगसगिरीचा पाढा सत्र न्यायालयापुढे वाचला. यावेळी आम्ही वॉरंटला स्थगिती दिलेली नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केल्यामुळे राणा यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे.

राखीव कोटय़ातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नवनीत व त्यांच्या वडिलांविरुद्ध मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर अटकेच्या भीतीने नवनीत यांनी दोषमुक्ततेसाठी शिवडीच्या विशेष न्यायालयात दाद मागितली. त्यावर न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. 

त्याविरूध्द नवनीत यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान मूळ तक्रारदार वंजारी यांनी हस्तक्षेप अर्ज केला असून त्यांच्यावतीने अॅड. सचिन थोरात यांनी मंगळवारी सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे युक्तिवाद केला. त्यांनी नवनीत राणा व त्यांच्या वडिलांच्या बोगसगिरीसंबंधीत आरोपपत्रातील पुराव्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच राणा यांच्याविरोधातील अटक वॉरंटच्या अंमलबजावणीबाबत विनंती केली. त्यांच्या विनंतीची दखल घेताना न्यायाधीशांनी आम्ही पोलिसांना वॉरंट जारी करण्याबाबत रोखले नसल्याचे स्पष्ट केले. वंजारी यांच्या अर्जावर नवनीत यांची बाजू ऐकून घेण्यासाठी न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी दिवाळी सुट्टीनंतर 3 नोव्हेंबरला घेण्याचे निश्चित केले.

एकनाथ शिंदे, सरनाईकांनीही केली होती शिफारस

नवनीत राणा यांच्या वडिलांना 2013 मध्ये ठाणे जिल्ह्यातून जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांनीदेखील संबंधित अधिकाऱयांना शिफारस केली होती. मात्र, त्यांचा ठाण्यातील प्रयत्न अपयशी झाला होता. त्यानंतर नवनीत व त्यांच्या वडिलांनी मुलुंडमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवले, असा दावा मूळ तक्रारदार वंजारी यांच्या वकिलांनी सत्र न्यायालयात केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.