Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कुमार शिराळकर यांचे निधन

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कुमार शिराळकर यांचे निधन


मागील चार दशकांहून अधिक काळ आदिवासी, शेतमजूरांसह समाजातील वंचित घटकांसाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ कम्युनिस्टनेते आणि विचारवंत कुमार शिराळकर यांचे रविवारी, 2 ऑक्टोबर रोजी रात्री निधन झाले. नाशिकमधील कराड रुग्णालयात  त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते 81 वर्षांचे होते. वर्ष 2019 पासून कर्करोगाने त्यांना ग्रासले होते. मात्र, मागील काही महिन्यात त्यांचा आजार बळावला. त्यांच्या निधनाने ध्येयवादी, तत्वनिष्ठ विचाराने वंचितांसाठी झटणाऱ्या एका समर्पित पर्वाची अखेर झाल्याची भावना व्यक्त होत आहे. आज सायंकाळी चार वाजता शहादा येथील मोडमधील कॉ. बी.टी. रणदिवे हायस्कूल प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडणार आहेत.

1970 च्या दशकात आयआयटी मुंबईतून सुवर्णपदक प्राप्त केलेल्या कुमार शिराळकर यांनी नोकरीचा त्याग करून तत्कालीन धुळे जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील आदिवासींवर जमीनदारांकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आयुष्य झोकून दिले. अंबरसिंह महाराज यांच्या नेतृत्वातील लढ्यात ते सहभागी होते. आपल्या अनेक मध्यमवर्गीय, सुशिक्षित साथीदारांना सोबत घेत आदिवासींची श्रमिक संघटना स्थापन केली. त्याचसोबत ते 'मागोवा' या क्रांतिकारी गटाचे सदस्य होते. नंदूरबारमधील आदिवासींच्या लढ्यात त्यांना जमिनदारांच्या हल्ल्यालाही सामोरे जावे लागले होते. या यशस्वी लढ्यानंतर त्यांचे काही सहकारी शहरात परतले. मात्र, शिराळकर नंदूरबारमध्येच स्थायिक झाले. त्यांनी 1982 मध्ये मार्क्सवादी कम्यु्निस्ट पक्षात प्रवेश केला. माकपशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय शेतमजूर युनियनमध्ये सक्रिय होते. या संघटनेचे कें राज्य सरचिटणीस आणि नंतर राष्ट्रीय सहसचिव म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. शिराळकर यांनी दलित पँथर चळवळ, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत सहभाग नोंदवला होता. नामांतर चळवळीत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. आदिवासींना कसत असलेल्या जमिनीचा अधिकार देणाऱ्या वनाधिकार कायद्याची नियमावली बनवण्यासाठी शिराळकर भारतभर पायपीट करून त्या कायद्याच्या अंमलबजावणीत मोठी कामगिरी केली.

लेखक, विचारवंत

शिराळकर हे चळवळीत सक्रिय असले तरी अतिशय कसदार लेखन आणि चिंतन करणारे मार्क्सवादी विचारवंत अशीही त्यांची ओळख होती. मार्क्स, बुद्ध, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक शिदोरीवर त्यांचा बौद्धिक पिंड जोपासला होता.

कुमार शिराळकर यांनी आदिवासी, शेतमजूर, ऊसतोडणी कामगार, दलित आदी घटकांच्या समस्या मांडणाऱ्या पुस्तिकांचे लिखाण केले होते. 1974 साली प्रकाशित झालेल्या 'उठ वेड्या, तोड बेड्या' हे त्यांचे पुस्तक चांगलेच गाजले होते. शिराळकर यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत ग्रामीण भागात तरुण कार्यकर्ते तयार झाले होते. जातीअंताची लढाई, महाराष्ट्रातील साखर उद्योग, ऊस शेती आणि ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न, वनाधिकार कायद्याची मीमांसा, आदिवासींचे जीवन, राष्ट्रीय रोजगार हमी कायदा आणि धर्माधतेचे राजकारण आदी विविध विषयांवर शिराळकर यांनी लेखन केले. 'नवे जग, नवी तगमग' हे त्यांचे आत्मपर पुस्तक काही वर्षांपूर्वी प्रकाशित झाले होते.

माकपची आदरांजली

आदिवासीपासून नामवंत पुरोगामी विचारवंतांपर्यंत त्यांनी सुह्रदांचे जाळे तयार केले होते. त्यांच्या निधनाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एक लढाऊ, सर्वहारा जाणीव पुरेपूर अंगिकारलेला, दूरगामी दृष्टी असलेला विचारवंत नेता गमावला आहे. त्यांची वैयक्तिक सुखाची तमा न करता त्यागी जीवन जगण्याची प्रेरणा आमच्या कार्यकर्त्यांना कठीण परिस्थितीवर मात करण्याचे बळ देईल, अशा शब्दात माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी त्यांना आदरांजली वाहिली. कुमार शिराळकर हे 2014 पर्यंत माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.