Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"पाेस्ट काेविडने वाढवला हृदयविकाराचा धाेका; लस न घेतल्यास धाेका दहापट अधिक"

"पाेस्ट काेविडने वाढवला हृदयविकाराचा धाेका; लस न घेतल्यास धाेका दहापट अधिक"


पुणे : काेराेना हा श्वसनमार्गाचा विकार असला, ताे श्वसनमार्गाद्वारे शरीरात प्रवेश करत असला तरी ताे शरीरातील इतर अवयवांना बाधित करताे. त्यामुळे काेराेना हाेऊन गेलेल्यांना (पाेस्ट काेविड) हृदयविकाराचा धाेका वाढला आहे. काेराेना प्रतिबंधक लस न घेतल्यास ताे दहापट वाढताे. डायबिटिसचा धाेका दुप्पट, स्मृतिभंश, प्रचंड थकवा, मेंदुविषयक आजार (न्युराेकाॅग्नेटिव्ह तक्रारी) वाढल्या आहेत, अशी माहिती जागतिक आराेग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डाॅ. साैम्या स्वामीनाथन यांनी दिली. त्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी पुण्यात बाेलत हाेत्या.

ओमिक्राॅन व 'एक्सबीबी' या नव्या व्हेरिएंटचा धाेक्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, काेराेनाची साथ अजून संपलेली नाही. एकट्या ओमिक्राॅनचे आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक उपप्रकार आढळून आले आहेत. त्यातच सध्या एक्सबीबी हा ओमिक्राॅनचा रिकाॅम्बिनंट व्हायरस हा उपप्रकार आला असून, ताे ओमिक्राॅनच्या दाेन उपप्रकारांच्या स्ट्रेनच्या जेनेटिक मटेरिअलपासून उत्क्रांत झालेला आहे. एक्सबीबी हा प्रतिकारशक्तीला किंवा अँटीबाॅडीला चकवा देऊन संसर्ग करू शकताे. त्यामुळे काही देशांमध्ये काेराेनाची लाट येऊ शकते, असेही सूचक विधान त्यांनी केले.

विषाणूमध्ये उत्परिवर्तन हाेऊन ताे आणखी संसर्गजन्य बनताे. हा नवीन विषाणू वैद्यकीयदृष्ट्या किती गंभीर आहे. याबाबत डेटा आता काेणत्याही देशाकडे उपलब्ध नाही; परंतु काही देशांमध्ये एक्सबीबीमुळे संसर्गाचा वेग वाढल्याचे तसेच हाॅस्पिटलमध्ये भरती करण्याची संख्यादेखील वाढल्याचे त्यांनी नमूद केले.

काेराेनाच्या आव्हानाला थाेपवण्याबाबत त्या म्हणाल्या की, आता आपल्याकडे काेराेनाला थाेपवण्यासाठी आणखी साधने आहेत. त्यापैकी लसीकरण हा महत्त्वाचा आहे, तसेच त्याला माॅनिटर व ट्रॅक करणे, जिनाेम सव्हेलन्स वाढवणे आणि संसर्ग हाेण्यापासून बचाव करणे हे आहे, तसेच ६० वर्षांपुढील लाेकसंख्या, हेल्थकेअर वर्कर व फ्रंटलाइन वर्कर यांचे लसीकरण करणे हे महत्त्वाचे आहे. लसीकरणामुळे काेराेनाचा माेठ्या प्रमाणात धाेका कमी हाेताे.

कफ सिरपचीही गंभीर दखल :

कफ सिरपमुळे गांबिया देशात ६६ मुलांचा मृत्यू झाला. याबाबत विचारले असता स्वामीनाथन म्हणाल्या की, हा प्रकार गंभीर असून त्याच्या तपास अहवालावर जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा सुरू आहे. यात नियामक संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सिरप तयार करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

लसीकरण सक्तीचे नकाे

कोरोना काळात लसीकरण सक्तीचे करण्याच्या धोरणाबाबतचा विचार जागतिक आराेग्य संघटनेने केला हाेता. त्याचे ताेटेच अधिक असल्याने ताे राबवला नाही. काही वर्षांनी हे लसीकरण नियमित आणण्यात येईल, असेही साैम्या स्वामीनाथन यांनी स्पष्ट केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.