Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपच्या जागा शिवसेनेने पाडल्या; मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता, अमित शहांनी सांगितला घटनाक्रम

भाजपच्या जागा शिवसेनेने पाडल्या; मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता, अमित शहांनी सांगितला घटनाक्रम


मुंबई: अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द मी उद्धव ठाकरे यांना कधीही दिलेला नव्हता, असे सांगतानाच २०१९ मध्ये युती असूनही शिवसेनेने भाजपच्या काही जागा पाडल्या, असा घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला.

अमित शहा यांनी २०१४ मध्ये शिवसेनेसोबतची युती तुटल्यापासूनचा घटनाक्रम सांगितला. त्यांनी गौप्यस्फोट केला की, २०१४ मध्ये केवळ दोन जागांच्या हट्टापायी शिवसेनेने युती तोडली. युती तोडून आपण जास्त जागा जिंकू आणि मुख्यमंत्रीपद मिळवू असे 'खयाली पुलाव' ते शिजवत होते; पण भाजपच्या जवळपास दुप्पट जागा आल्या. शिवसेना भाजपपेक्षा लहान पक्ष झाला. ते आम्ही नाही केले, त्यांनीच युती तोडून पायावर दगड मारून घेतला. उद्धव ठाकरे यांचा अहंकार त्यावेळी आडवा आला. निकालानंतर शिवसेना सुरुवातीला आमच्यासोबत आली नाही. आम्ही ठरवून टाकले की अटलजींसारखे तेरा दिवसांचे का होईना; पण सरकार आणायचेच. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले. आमच्याकडे बहुमत नव्हते; पण मग शिवसेनेची मजबुरी होती, ते आमच्यासोबत आले आणि सरकार पाच वर्षे टिकले.

फडणवीस यांचा 'तो' फोन

* २०१९ मध्ये एकदा रात्री दोन वाजेच्या सुमारास मला देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. लोकसभा निवडणुकीच्या आधीची ही गोष्ट आहे. लोकसभा, विधानसभेची युतीची बोलणी एकत्रितच करा आणि आम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद द्या असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत, असे फडणवीस माझ्याशी बोलले. मी कधी नशापाणी करीत नाही.

* मी त्यांना बजावून सांगितले की, मुख्यमंत्रिपद त्यांना मिळणार नाही. युती तुटली तरी चालेल; पण तरीही आपल्या केंद्रीय नेतृत्वाशी त्यांना बोलून घ्यायला सांगा, असे मी फडणवीसांना सांगितले. त्यानुसार ठाकरे आमच्या नेतृत्वाशी (पंतप्रधान मोदी) बोलले. त्यानुसार पाचही वर्षे भाजपकडेच मुख्यमंत्रिपद राहील, असे ठरले.

अमित शहा यांनी आ. आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशाचे सपत्नीक दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील गणरायाचे दर्शनही त्यांनी घेतले. मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले.

* २०१९ मध्ये युतीची घोषणा करण्यासाठी मी मुंबईत आलो. मी उद्धव ठाकरेंना फोन केला. पत्र परिषद घेऊन युतीची घोषणा करण्याचे ठरले. पत्र परिषदेत काय बोलायचे तेही आमचे ठरले. पत्र परिषदेत मुख्यमंत्रिपदाबाबत आपण काहीही बोललात तर मी युती तोडेल, असे मी त्यांना बजावून सांगितले होते. ते म्हणाले, मी मुख्यमंत्रिपदाबाबत काहीही बोलणार नाही. ते बोललेदेखील नाहीत. बंद दाराआड आमचे काहीही ठरलेले नव्हते, आमचे जे काही असते ते सगळे उघड; सार्वजनिक असते, असेही ते म्हणाले.

शहा म्हणाले, भाषण पब्लिकसाठी नाही; पण अख्खे भाषणच चॅनलवर

* माझे भाषण बाहेर जाता कामा नये, अशा स्पष्ट सूचना अमित शहा यांनी दिल्यानंतरही त्यांच्या भाषणाचे रेकॉर्डिंग चॅनलपर्यंत पोहोचल्याने भाजपत खळबळ उडाली आहे. हे नेमके केले कोणी याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

* फडणवीस यांच्या मेघदूत बंगल्यात शहा यांचे भाषण सुरू होताच दोन जण हातातील मोबाइल उंचावून त्यांच्या भाषणाचे रेकॉर्डिंग करू लागले. शहा यांनी त्यांना लगेच रोखले. रेकॉर्डिंग करण्याची गरज नाही, माझे भाषण केवळ तुमच्यासाठी आहे, पब्लिकसाठी नाही, असे बजावले. तेव्हा दोघांनीही रेकॉर्डिंग बंद केले. तथापि भाषण संपल्यानंतर काहीच मिनिटांत दोन-तीन चॅनल्सवर त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवले गेले. याचा अर्थ शहा यांचा आदेश पाळला गेला नाही. कोणीतरी रेकॉर्डिंग केले आणि चॅनल्सना पुरविले.

* भाषण बाहेर जाता कामा नये असे बजावले असतानाही असे कसे घडले असा जाब शहा यांनी वरिष्ठ नेत्यांना विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाषण फोडले कोणी याची चौकशी होण्याची शक्यता आहे, तसेच अशा महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्यांचे मोबाइल आधीच जमा करून घेण्यात येणार आहेत.

प्रदेश कोअर कमिटीची बैठक

अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची स्वतंत्र बैठक झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना शहा यांनी राज्यात लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचे ध्येय ठेवा आणि विधानसभेवर झेंडा फडकवण्याची आतापासूनच तयारी करा, असे सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.