देशातील सर्वात मोठ्या चोराच्या मुसक्या आवळल्या
नवी दिल्ली : आजपर्यंत आपण छोट्या मोठ्या चोरट्यांना अटक केल्याच्या बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील…पण दिल्ली पोलिसांनी ज्या चोराला अटक केली आहे त्याची श्रीमंती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्की बसेल कारण दिल्ली पोलिसांनी ज्या चोराला अटक केली आहे तो देशातील श्रीमंत चोर असल्याचे म्हटले जात आहे. तीन महिन्यांहून अधिक काळ पाठपुरावा केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अनिल चौहानच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अनिल चौहान याच्यावर पाच हजाराहून अधिक गाड्या चोरल्याचा आरोप आहे. अनिल चौहान आपल्या जीवनशैलीमुळे ओळखला जात होता. त्याला महागडे कपडे, सोन्याचे ब्रेस्लेट यांची आवड होती. विशेष म्हणजे त्याच्याकडे तब्बल १० कोटींचा व्हिला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाड्यांची चोरी करण्यासाठी अनिल चौहान विमानाने प्रवास करायचा. राजधानीत चोरी केल्यानंतर तो परत जायचा. त्याने गंगटोक, आसाम, नेपाळ आणि इतर काही ठिकाणी आपल्या २५ ते ३० सहकाऱ्यांच्या मदतीने या गाड्यांची विक्री केली. त्याला याआधीही अटक करण्यात आली होती. पण या प्रकरणाचा तपास सहज नव्हता.
पोलीस निरीक्षक संदीप गोदरा यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मध्य दिल्लीमधील महागड्या एसय़ुव्ही आणि सेदान गाड्यांच्या चोरीचा तपास केला असता अनिल चौहान याच्यावर संशय आला. "आसाम, सिक्कीम, नेपाल आणि एनसीआरमध्ये पथक त्याचा शोध घेत होते. अटक टाळण्यासाठी तो महागड्या गाड्यांमधून फिरत असे. आपण व्यवसायिक किंवा सरकारी अधिकारी असल्याचे तो भासवत असे. तो कंत्राटदार होता आणि आसाम सरकारसोबत काम करत होता. त्याच्या तिथे अनेक ओळखी होत्या". २३ ऑगस्टला पोलिसांना चौहान दिल्लीत असून सहकाऱ्यांसोबत चोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. "आम्ही डीबीजी रोडवरुन त्याला दुचाकी आणि पिस्तूलसहित अटक केली. यानंतर अजून पाच पिस्तूल त्याच्याकडे सापडले," अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
गेल्या दोन दशकांमध्ये, चौहान याने केवळ कार चोरल्या नाही तर, शिंगांसाठी गेंड्यासारख्या दुर्मिळ प्राण्यांची शिकारही केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने गाड्यांमधून शस्त्रांची तस्करी केली. जवळपास १८१ प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग असून, कोर्टाने त्याला फरार घोषित केलं होतं. ईडीने याप्रकरणी त्याचा १० कोटींचा व्हिला आणि इतर संपत्ती जप्त केली आहे.
चौहानला तीन पत्नी आणि सात मुलं आहेत. ईडीचा छापा आणि अटकेनंतर ते त्याला सोडून गेले होते. दोन पत्नींनी आपल्याला त्याच्या गुन्ह्यांबद्दल काही माहिती नव्हती असा दावा केला आहे. "जानेवारी महिन्यात आसाममधून त्याला अटक करण्यात आली होती. पण त्याची जामिनावर सुटका झाली होती. यावेळी आम्ही कोर्टात त्याच्याविरोधातील सर्व पुरावे सादर करणार असून, लवकर जामीन मिळणार नाही यासाठी प्रयत्न करणार आहोत. रेकॉर्डनुसार, १९९० मध्ये त्याने चोरीला सुरुवात केली होती. अनेक केसमध्ये त्याला दोषी ठरवण्यात आलं आहेत. परदेशात अंमली पदार्थांची तस्करी करण्याचाही त्याचा प्रयत्न होता," अशी माहिती डीसीपी श्वेता चौहान यांनी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.