उद्धव ठाकरे सात्विक अन् प्रामाणिक माणूस; मात्र ते...
अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोण खरं बोलतं?
हे त्या दोघांनाच माहित. मात्र उद्धव ठाकरे हे प्रामाणिक आणि सात्विक असून ते सेनाभवनमध्ये जेवढे शोभून दिसायचे तेवढे वर्षा बंगल्यावर नव्हते, हे दुर्दैव असल्याचा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून शोभत होते, मात्र मुख्यमंत्री म्हणून अडचणीचे होते, हे सत्य असल्याचं कडू यांनी सांगितलं. करमाळा येथील श्री कमलाभवानी रक्तपेढी लोकार्पण समारंभासाठी आमदार बच्चू कडू उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांचा नागरी सत्काराच्या कार्यक्रमानंतर बच्चू कडू बोलत होते.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर अनेक नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या असल्या तरी जेवढा विस्तार लांबेल तेवढी प्रवेश करणाऱ्यांची गर्दी वाढेल, असा टोलाही बच्चू कडू यांनी यावेळी लगावला आहे. मी राजकारणी असल्यानं मला मंत्रिपदाची अपेक्षा आहे, अशी कबुली देताना मंत्रिपदामुळे लोकांची कामं होतात, तसा माझाही स्वार्थ असल्याचं कडू यांनी सांगितलं. दिल्ली प्रमाणे महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्था असणं गरजेचं असून त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी आणि आरोग्यमंत्र्यांशी बोलून अशा सुविधा तयार कराव्या अशी मागणी करणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. सध्या पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसे हे समीकरण रूढ होऊ लागलं असताना जाती पाती, पैसे आणि धान्य वाटून मतं मिळवण्यापेक्षा त्यापुढील विचार करून जनतेसाठी सत्ता याचा राजकारण्यांना विसर पडत नसल्याची खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे शिवाजी सावंत, नारायण आबा पाटील, रश्मी बागल यांच्यासह करमाळा परिसरातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनेक दिवसांपासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्या मंत्रिमंडळ विस्तारात मात्र प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे बच्चू कडू यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना हे सरकार धोका देणारं सरकार आहे, असं वक्तव्य केलं आणि त्यावरून मंत्रीपद न मिळाल्यामुळं बच्चू कडू यांची नाराजी समोर आली. तसेच, जर मंत्रीपद मिळालं नाही तर मात्र आपण वेगळा निर्णय देखील घेऊ शकतो, असा देखील इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांची मंत्रिपदी वर्णी लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.