व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या
मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज तात्काळ सादर करावा - धम्मज्योती गजभिये
सांगली दि. 8 : शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. सन 2022-23 या वर्षासाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेले नाहीत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज तात्काळ सादर करावेत, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे चे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.
शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याने चालू शैक्षणिक वर्षात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केला नाही त्यांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा व त्या अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडून ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केला आहे त्याच जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे विलंबाबाबतच्या हमीपत्रासह त्वरीत सादर करावी. जात वैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यास आरक्षणातून प्रवेश मिळाला नाही तर त्यास जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जबाबदार राहणार नाही असे हमीपत्र अर्जदाराने अर्जाच्या प्रतीसोबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. हमीपत्राचा नमुना बार्टीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सदर हमीपत्राचा नमुना उपलब्ध असल्याचे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.