शिवतीर्थावर आवाज शिवसेनेचाच, शिंदे गटाला घ्यावी लागणार माघार?
मुंबई, 4 सप्टेंबर : शिवसेना फुटल्यानंतर शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार यावरून मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. शिवसेना आणि शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. पण, शिवतीर्थावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच आवाज घुमणार अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेनं मुंबई पालिकेकडे सर्वात आधी अर्ज केला आहे. त्यानंतर शिंदे गटाकडून अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या धोरणानुसार, शिवसेनेला परवानगी मिळणार आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आला आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यावर शिंदे गटानेही दावा केल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. पण, राज्य सरकारने ठरवून दिलेले धोरणच शिंदे गटाला माघार घेण्यास भाग पाडू शकते. शिवतीर्थावर मेळावा किंवा सभा घेण्याची परवानगी देण्याबाबत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य परवानगी देण्याचं पालिकेचं धोरण आहे.
त्यानुसार, शिवसेनेनं 15 दिवसांपूर्वीच मुंबई पालिकेकडे अर्ज दाखल केला आहे. सेनेच्या अर्जानंतर 15 दिवसांनी शिंदे गटानेही अर्ज केला आहे. त्यामुळे शिवसेनेनं पहिला अर्ज केल्यामुळे पालिका शिवसेनेला परवानगी देण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, शिवतीर्थ हा मुंबई उच्च न्यायालयााने शांतता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
त्यानुसार, वर्षातून 45 दिवसच शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी आहे. या 45 दिवसांपैकी 9 सभा घेण्याचे अधिकार हे राज्य सरकारकडे आहे. तर उर्वरीत 36 अधिकार हे मुंबई पालिका देत असते. राज्य सरकारकडे ज्या 9 परवानगी देण्याचे अधिकार आहे, त्यामुळे दसरा मेळावा येत नाही.
त्यामुळे दसरा मेळाव्याला परवानगी देण्याचा अधिकार हा मुंबई पालिकेला आहे. या निर्णयामध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. फक्त काही कारणासाठी सूचना करू शकते, असं वृत्त दिव्य मराठीने दिले आहे. दरम्यान, हे. शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्यावरून आतापर्यंत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यात स्पर्धा सुरू असतानाच यात आता राज ठाकरेंची एण्ट्री झाली आहे. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्वीटमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून येऊ शकतात, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. राज ठाकरेंना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यासाठी शिंदे गट जोरदार प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.