सांगली जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या घरांसाठी राज्याला आदर्शवत ठरेल असा पथदर्शी गृह प्रकल्प राबविणार - कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 07, : इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काची घरे मिळावीत यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील असून सांगली जिल्ह्यात बांधकाम कामगारांसाठी राज्याला आदर्शवत ठरेल असा पथदर्शी गृह प्रकल्प राबविणार असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात अटल आवास योजना शहरी / ग्रामीण अंतर्गत बांधकाम कामगारांच्या घरबांधणीकरीता जागा उपलब्ध करून देण्याबाबत कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, प्रांताधिकारी मिरज डॉ. समीर शिंगटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रतापसिंह जाधव, नगरपालिकेंचे प्रशासकीय अधिकारी यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सांगली जिल्ह्यात सुमारे 65 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. याशिवाय ज्या बांधकाम कामगारांची अद्यापही नोंदणी झालेली नाही त्यांची नोंदणी तात्काळ करून घ्यावी. जिल्ह्यातील किती नोंदणीकृत बांधकाम कामगारांकडे जमीन उपलब्ध आहे, जिल्ह्यात घरांची आवश्यकता असणारे बांधकाम कामगार किती आहेत, त्यासाठी किती जागेची आवश्यकता आहे, उपलब्ध जागा किती आहे, उपलब्ध जागेची मालकी कोणत्या प्रकारची आहे, या सर्व बाबींची तपशिलवार तालुकानिहाय माहिती 28 सप्टेंबर 2022 पूर्वी तयार करावी. या माहिती सोबतच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गायरान जागांची माहितीही तात्काळ संकलित करावी, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक असल्याने ज्या बांधकाम कामगारांनी अद्यापही आपली नोंदणी केली नाही त्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी, असे आवाहनही कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.