सोनालीच्या नावावर वसुली रॅकेट चालवत होता सुधीर सांगवान, लोकांना लाखोंचा गंडा
मुंबई, 4 सप्टेंबर : भाजप नेत्या आणि 'बिग बॉस' फेम अभिनेत्री सोनल फोगट यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. सुरुवातीला हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं.
परंतु अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित करुन सोनालीचा घातपात झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. काल सोनाली यांचा पीए सुधीर सांगवानने खुनाची कबुली दिल्याची चर्चा सुरु होती. दरम्यान आता या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे.
सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. यामध्ये अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. आज तकच्या वृत्तानुसार, सध्या पोलिसांच्या ताब्यात असणारा सोनाली फोगटचा पीए सुधीर सांगवान बाबत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुधीर सांगवान हा सोनाली फोगटच्या नावावर अवैध वसुली रॅकेट चालवत होता.
यामध्ये त्याने अनेक लोकांकडून लाखो रुपये उकळले आहेत. सुधीर सांगवानने क्रिटिव्ह ऍग्रीटेक नावाच्या फर्मच्या आधारे कृषी कर्जाच्या नावाखाली अनेकांना लाखोंचा गंडा लावला आहे. सुधीर सांगवानने या लोकांकडून कधी स्वस्तात बँकेकडून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली तर कधी सब्सिडी देण्याचा नावाखाली हे पैसे उकळले आहेत. जेव्हा ते लोक आपला पैसा परत मागत तेव्हा सुधीर त्यांना पोलिसांची धमकी देऊन भीती दाखवत असे.
यापूर्वी सुधीरने पोलिसांना सोनालीच्या लॉकर्सचे चूकीचे पासवर्ड सांगितले होते. त्यानंतर सोनालीच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत पोलिसांनी हे लॉकर सील केले आहेत. याआधी गोवा पोलिसांनी खुलासा करत सांगितलं होतं की, सोनाली फोगटच्या संपत्तीवर सुधीर सांगवानचा डोळा होता. सोनालीचा फार्महाऊस सुधीरला 20 वर्षांसाठी भाडेतत्वावर हवा होता. परंतु तो वर्षाकाठी केवळ 60 हजार रुपये देऊन या फार्महाउसची डील करण्याच्या विचारात होता. आता पोलिसांनी या दिशेनेसुद्धा तपास सुरु केला आहे.दरम्यान एबीपीच्या वृत्तानुसार, सोनाली फोगटच्या मृत्यूचा कट रचल्याची कबुली आरोपी सुधीर सांगवान याने दिल्याची माहिती गोवा पोलीस सूत्रांनी दिली आहे. सोनाली फोगटच्या हत्येतील आरोपींना जबाबदार धरण्यासाठी खटल्यादरम्यान न्यायालयात जमा झालेले पुरावे पुरेसे ठरतील असा विश्वासही गोवा पोलिसांनी व्यक्त केला आहे.याबाबतची अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाहीय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.