"सुप्रिया सुळे एखाद्या वरमाईसारख्या वावरत होत्या"; आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका
बारामतीला सतत तुम्ही बालेकिल्ला म्हणता. हा कसला बालेकिल्ला? ही तर नुसती टेकडी आहे. दोन वर्षांपासून मी ही टेकडी ठोकून काढतोय. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, तेव्हा सुप्रिया सुळे एखाद्या वरमाईसारख्या वावरत होत्या. एखाद्याला फसवून लुबाडून घेण्यात बारामतीकरांना फार आनंद वाटतो, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.
पडळकर म्हणाले की, फडणवीस यांना सत्ता मिळू न देण्याचे षडयंत्र होते. मात्र, तरीही ते सत्तेत आले. शरद पवारांचे हे खरे दुःख आहे. आता 2024 मध्ये प्रस्थापितांचे विसर्जन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे बारामतीत आले आहेत. आता शरद पवारांना श्रीलंकेतील राष्ट्राध्यक्ष जसे पळून गेले, तसे पळून जावे लागेल. निर्मला सीतारामन हे बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. बारामती लोकसभेचे कधी ऑपरेशन होईल हे देखील पवारांना कळायचं नाही. पाकिस्तानची मॅच जिंकल्यावर शरद पवार हात वर करतात. मात्र, त्यांना आता आरती करतानाचे व्हिडिओ टाकावे लागत आहेत, हेच भाजपचे यश आहे.
महाविकास आघाडीने वीज तोडली. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे उर्जामंत्री असताना एकाही शेतकऱ्याची वीज तोडली नव्हती. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण महाविकास आघाडीला देता आले नाही. मात्र, फडणवीस सत्तेत येताच ओबीसी आरक्षण परत मिळाले.ज्या बावनकुळेंना 2019 मधील विधानसभेत उमेदवारी नव्हती, ते आता 288 मतदारसंघात उमेदवारी देणार आहेत. हा भाजपमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा नेहमीचा सन्मान आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.