अनिल परब यांचे साई रिसॉर्ट तोडण्याची जबाबदारी बांधकाम खात्याकडे
रत्नागिरी : माजी मंत्री अनिल परब यांचे वादग्रस्त साई रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याच्या प्रकियेला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुरूड(ता.दापोली) येथील वादग्रस्त रिसॉर्ट तोडण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
केंद्र सरकारने २२ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्र कोस्टल झोनला मॅनेजमेंट ॲथॉरिटीला दापोलीतील साई रिसॉर्ट आणि सी क्रौंच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार आज जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कोस्टल झोन मॉनिटरिंगची कमिटी आणि जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक झाली. यावेळी पोलीस यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, जिल्हा परिषद ग्रामविकास विभागासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
दापोलीतील साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला होता. त्यासंदर्भात कागदपत्रेही प्रशासनाला पुरविली होती. हे रिसॉर्ट पाडण्यासाठी केंद्र सरकारकडेही पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून, रिसॉर्ट पाडण्याचे आदेश केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहेत.
या बैठकीबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने साई रिसॉर्ट आणि सी कौंच रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. ही कार्यवाही करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. बांधकाम विभाग त्यासाठी लवकरच एजन्सी नियुक्त करणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. दरम्यान, रिसॉर्ट तोडण्यासाठी पावले उचलली जात असली, तरीही त्यासाठी किती वेळ लागेल याबाबत अजूनही प्रशासनाकडून ठोसपणे सांगितले गेलेले नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.