Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लम्पी स्कीन डिसीज रोगाची लागण झालेल्या पशुधनाच्या 5 कि. मी. त्रिज्येत येणाऱ्या सर्व पशुधनाला तात्काळ लसीकरण करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

लम्पी स्कीन डिसीज रोगाची लागण झालेल्या पशुधनाच्या 5 कि. मी. त्रिज्येत येणाऱ्या सर्व पशुधनाला तात्काळ लसीकरण करा  - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी


सांगली, दि. 07,  : पशुधनाचे लम्पी स्कीन डिसीज रोगापासून संरक्षण करण्यासाठी या रोगाची लागण झालेल्या पशुधनाच्या 5 कि. मी. त्रिज्येत येणाऱ्या सर्व पशुधनाला तात्काळ लसीकरण मोहिम सुरू करा. तसेच लम्पी स्कीन डिसीज रोगाच्या प्रतिबंधासाठी पशुसखी यांना प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात लम्पी स्कीन डिसीज रोगाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी निखीलकुमार ओसवाल, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. एस. बेडक्याळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, पशुधन विकास अधिकारी डॉ. अमित चौगुले, सहायक पशुधन विकास अधिकारी विरूपक्ष खंदारे आदि उपस्थित होते.

लम्पी स्कीन डिसीज या रोगाने राज्यात सद्यस्थितीत 2 हजाराहून अधिक जनावरे बाधित आहेत. सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत 6 जनावरे बाधित असून या सर्व जनावरांवर उपचार सुरू आहेत. या जनावरांपासून इतर सुदृढ जनावरांना त्याची बाधा होवू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने सर्व ती खबरदारी घ्यावी, असे आदेशीत करून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, या रोगाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक लसींची मात्रा उपलब्ध ठेवण्यात यावी. तसेच लसीकरणही गतीने करण्यात यावे. त्याचबरोबर या रोगाची जनावरांना लक्षणे आढळताच त्यांचे सॅम्पल तातडीने घेण्यात यावे व ते तपासणीसाठी संबंधित प्रयोगशाळांकडे पाठविण्यात यावेत. गोमाशी, गोचिड, माशी, डास या किटकांमुळे हा रोग पसरत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने गोचीड, गोमाशी, माशी, डास यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी औषध फवारणीची मोहिम सुरू करावी.

पशुधनाच्या मालकांनी बाधीत जनावरे कुरणामध्ये अथवा चरण्यासाठी बाहेर सोडू नयेत. तसेच संबंधित जनावरांचे दुध काढून ते खाण्यासाठी वापरू नये व डेअरीमध्येही घालू नये. संबंधित जनावरांचे दुध काढल्यानंतर ते तात्काळ नष्ट करावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, लम्पी स्कीन डिसीज रोगामुळे दुर्देवाने पशुधन दगावल्यास त्याची योग्य प्रकारे दक्षता घेवून विल्हेवाट लावावी. यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. पशुधनास सदर रोगाची लागण झाल्यास आयुर्वेदिक उपचार म्हणून हळद, लिंबोळीचा पाला, करंजीचे तेल याचा उपचारासाठी वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी केले. 

यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. एस. बेडक्याळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी लम्पी स्कीन डिसीज रोगासंदर्भात जिल्ह्यात सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत म्हणाले, लम्पी स्कीन डिसीज (एल.एस.डी.) हा विषाणूजन्य रोग आहे. हा प्रामुख्याने गाई, बैल, वासरांना होणारा विषाणूजन्य आजार आहे. कॅप्रीपोक्स या प्रवर्गातील विषाणूमुळे हा रोग होतो. देशी जनावरांपेक्षा संकरीत जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. हा विषाणूजन्य आजार असल्याने त्यावर विशेष उपचार नाही. परंतु जखमांमध्ये जिवाणूचा संसर्ग होवून इतर आजार वाढू नये म्हणून प्रतिजैविके व इतर औषधे पशुवैद्यकांच्या सल्ल्याने घ्यावी लागतात. पाच ते सात दिवसांच्या नियमित योग्य उपचाराने हा पूर्णपणे बरा होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेले पशुधन आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून त्याची त्वरीत माहिती द्यावी. तसेच आजारी पशुधन अन्य निरोगी जनावरापासून वेगळे बांधावे.

या रोगाचा प्रसार कीटक, डास, चावणाऱ्या माशा, गोचिड आदींमार्फत होतो. या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील स्पर्शाने होतो. उष्ण व आर्द्र हवामानात या रोगाचा जास्त प्रसार होतो. या रोगाची बाधा गाय व म्हैसवर्गातील सर्व वयोगटाच्या जनावरांना होते. लहान वासरांमध्ये रोगाची तीव्रता अधिक दिसून येते. या रोगाचा प्रसार साधारण १० ते २० टक्के जनावरांमध्ये होतो. आजारामुळे जनावरे मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी रोगी जनावरे अशक्त होतात. त्याचे दुध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते. काही वेळा गर्भपात होऊन प्रजनन क्षमता घटते. या रोगात जनावराची त्वचा खराब झाल्याने जनावर विकृत दिसते.

या आजारामध्ये जनावरांना ताप येणे, डोळ्यातून तसेच नाकातून स्त्राव होणे, भूक मंदावणे आदी सुरुवातीची लक्षणे दिसतात. नंतर जनावराच्या अंगावर विशेष करून डोके, मान, मायांग, कास, पोटाकडील भाग आदी ठिकाणी २ ते ५ सेंटीमीटर व्यासाच्या गाठी येतात. त्यातून पू  येवू शकतो. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होवू शकतो. जनावरांचे दुध उत्पादन कमी होते.

लम्पी स्कीन डिसीज (एल.एस.डी.) या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक आहे. लम्पी स्कीन डिसीज (एल.एस.डी.) चा प्रादुर्भाव झालेले पशुधन आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून  त्याची माहिती द्यावी. तसेच आजारी पशुधन अन्य निरोगी जनावरापासून वेगळे बांधावे. गोठा व परिसर स्वच्छ आणी हवेशीर ठेवावा. परिसरात पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच बाधित जागेचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी Sodium Hypochlorite २-३%, Phenol २% 15 मिनींटासाठी वापरणे इत्यादी औषधांचा वापर करावा. गोचिड/गोमाशा प्रतिबंधक अथवा कीटकनाशक औषधांचा फवारा पशुधनाच्या अंगावर करणे आणि गोठ्यात व आसपासच्या परिसरात फवारणे. प्रादुर्भाव ग्रस्त भागात जनावरांची ने-आण करणे किंवा खरेदी-विक्री करणे या गोष्टी टाळणे. रोग ग्रस्त पशुधनाचा मृत्यू झाल्यास, मृतदेह ८ फूट खोल खड्ड्यात स्थानिक पशुवैद्यकांच्या सल्ल्याने पुरण्यात यावा. प्राण्यांमधील सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मधील कलम ४ नुसार पशुपालकांनी/ इतर कोणतीही व्यक्ती/ शासनेत्तर संस्था/ सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत यांनी रोगप्रादुर्भावाची माहिती नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास त्वरीत देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.