NCP करणार शिंदे गटाच्या ५ आमदारांचा 'करेक्ट'कार्यक्रम; जयंत पाटील म्हणाले...
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्ह्यात शिंदे गटातील पाच आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करणार असून, त्यांच्या मतदारसंघात '५० खोके, एकदम ओके' घोषणा छापलेले टी-शर्ट मोठ्या संख्येने वितरीत करण्यात येणार आहेत. याच घोषणेमुळे विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार एकमेकांना भिडले होते.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी, आढावा बैठक जळगाव शहरातील पक्ष कार्यालयात झाली. यावेळी टी-शर्टच्या सूचनेला त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाला. पक्षाचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. ते म्हणाले, की आज जनतेला विश्वास आहे की, शिंदे सरकार टिकणार नाही. त्यांना राष्ट्रवादीवर भरवसा आहे. '५० खोके, एकदम ओके'प्रत्येक घरात आणि झोपडीत गेले आहे. पाच आमदारांच्या मतदारसंघात ही घोषणा छापलेले टी-शर्ट वाटा. उमेदवाराने १० हजार आणि पक्षाने १० हजार टी शर्ट वाटावेत. त्यानंतर बघा, राष्ट्रवादीचा उमेदवार १०० टक्के निवडून आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.
जिल्ह्यातले जे पाच फुटले त्यांच्या जागा राष्ट्रवादीला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यात नसतील एवढे नऊ माजी आमदार जिल्ह्यात आहेत. त्यापैकी सात परत निवडून आणण्यासाठी कामाला लागूया, असे आवाहन त्यांनी केले. तालुकाध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख यापुढे लोकांच्या मनातील असावा, अशी मागणी त्यांनी केली.
अट एकच, टी शर्ट कायम डोळ्यासमोर ठेवा
प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी टी-शर्टच्या सूचनेची तात्काळ दखल घेतली. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ता नाराज आहे. टी-शर्ट वाटा आणि तो कायम लोकांच्या डोळ्यासमोर राहील याची काळजी घेत रहा, अशी सूचना केली.
चार ओरिजनल आणि एक डुप्लिकेट
आ. अनिल पाटील म्हणाले, की नियोजनपूर्वक काम केल्यास जिल्ह्यातून पक्षाचे सात ते आठ आमदार आणि दोन खासदार निवडून येतील. आता जे चार गेले आहेत. त्यांच्यात एक ॲडिशनल आहे. चार ओरिजनल आणि एक डुप्लिकेट आहे. आपण पाठिंबा दिला नसता तर तो निवडूनही आला नसता. या पाच जणांना घरी पाठवायची मानसिकता जिल्ह्यात आहे. मनपा व जि.प.निवडणुकीत आ. गिरीश महाजांनी दोनशे, पाचशे, सातशे कोटी अशी नुसतीच आकड्यांची फेकाफेकी केली होती. सत्ता येताच त्याचा विसर पडल्याचेही आ. पाटील म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.