देशाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान महत्वपूर्ण - माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख
सांगली, दि. 9, : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या स्वातंत्र्य लढ्यात महिलांचेही योगदान अभूतपूर्व असून देशाच्या जडणघडणीमध्ये महिलांचा सहभाग, वीरमातांचे योगदान, त्याचबरोबर जगाला दिशा देणाऱ्या भारतीय वीरकन्यांचे योगदान मोठ्या प्रमाणात असल्याचे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी केले.
मिरज तालुका प्रशासनाच्या वतीने बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी न्यायाधीश श्री. बंडगर, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, तहसीलदार डी. एस. कुंभार, गटविकास अधिकारी आप्पासो सरगर, गटशिक्षणाधिकारी डॉ. सुरेश माने, महिला व बाल कल्याण प्रकल्प अधिकारी श्रीमती साळुंखे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख म्हणाले, महिलांनी स्वत:ची मानसिकता व आर्थिक ताकद ओळखून कुटुंबाबरोबरच सुदृढ निकोप समाज घडवावा. ज्या समाजामध्ये महिलांना सन्मान मिळेल, देशामध्ये महिलांच्या संरक्षणाकरीता कायदे करण्याची गरज भासणार नाही अशा पध्दतीने पुढची संस्कारक्षम पिढी घडवावी, असेही ते म्हणाले.
यावेळी न्यायाधीश श्री. बंडगर यांनी गर्भापासून मृत्यूपर्यंत महिलांकरीता अन्याय अत्याचारापासून संरक्षण मिळण्याकरीता अस्तित्वात असलेल्या कायद्यांबाबत सखोल मार्गदर्शन केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात विविध महिला गटांनी हर घर तिरंगा अंतर्गत हर घर पोषण याचे विविध स्टॉल लावले होते. तसेच विविध पदार्थांचे, बचत गटाने तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.