Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'हर घर तिरंगा' उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग घेवून सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

'हर घर तिरंगा' उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग घेवून  सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन


सांगली दि. 1  : 'हर घर तिरंगा' या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घरावर / इमारतींवर ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करून राष्ट्रध्वज उभारायचा आहे. यासाठी नागरिकांनी स्वतः दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत आपल्या घरावर / इमारतीवर राष्ट्रध्वज उभारावा. तसेच भारतीय राष्ट्रध्वज फडकविताना ध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन करावे व जाणते अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता घ्यावी. आपण हर घर तिरंगा या ऐतिहासिक उपक्रमात भारतीय नागरिक म्हणून सक्रिय सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत, स्वातंत्र्याच्या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा देऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या स्वातंत्र सेनानी, क्रांतिवीराचे स्मरण करणे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. देशभक्तीची जाज्वल्य भावना जनमानसात कायम राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे 'हर घर तिरंगा' हा ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

हर घर तिरंगा उपक्रम अंमलबजावणीकरिता मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे. काय करावे - 

(१) ध्वज हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनव्दारे तयार केलेल्या सूत / पॉलिस्टर / लोकर / सिल्क / खादीपासून बनविलेल्या कपड्याचे असावा. 

(२) विभाग / कार्यालय प्रमुख / नागरीक यांनी आपल्या कार्यालयावर / घरावर दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ध्वज फडकवावा. 

(३) ज्या ज्या ठिकाणी ध्वज उभारतात अशा प्रत्येक ठिकाणी तो उच्च स्थानी आणि स्पष्टपणे दिसेल अशा रितीने लावला पाहिजे.  (अ) दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 रोजी ध्वज सुर्योदयावेळी फडकवावा व सुर्यास्तावेळी उतरवावा याबाबत कार्यालयांना ध्वजसंहिता पाळावी लागेल. (ब) घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरवयाची आवश्यकता नाही. 

(४) ध्वज लावताना केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी. ध्वज उलटा फडकवला जाणार नाही याची काळजी घ्यावी. 

(५) ध्वज उतरविल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो कपाटात ठेवावा. 

(६) सर्व अधिकृत समारंभात लावला जाणारा ध्वज हा भारतीय मानक कार्यालयाच्या निकषानुसार व त्यांचे बोधचिन्ह असलेलाच असेल. 

(७) हर घर तिरंगा बाबत फोटो व माहिती अपलोक करण्यासाठी (अ) https://amritmahotsav.nic.in  (ब) https://mahaamrut.org/ या लिंकचा वापर करावा. 

(८) जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथील sangliweb@gmail.com यावरही माहिती व फोटो पाठविण्यात यावेत.

काय करू नये - 

(१) प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर करू नये 

(२) ध्वज फाटलेला अथवा चुरगळलेला लावता कामा नये 

(३) ध्वज ज्या काठीवर फडकत असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार घालु नयेत (४) इतर कोणताही ध्वज राष्ट्रीय ध्वजापेक्षा उंच नसावा व राष्ट्रीय ध्वजाच्या लगत नसावा 

(५) ध्वजाचा स्पर्श जमीनीस होऊ देऊ नये 

(६) ध्वज फाटेल अशा पध्दतीने फडकवू नये अथवा बांधू नये 

(७) ध्वज मलीन होईल अशा प्रकारे वापरू नये अथवा ठेवू नये 

(८) ध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षरे लिहू नयेत 

(९) अभियान कालावधीनंतर झेंडा फेकला जाऊ नये. तो सन्मानाने जतन करून ठेवावा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.