Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अपहृत बांधकाम व्यावसायिकाचा खून; कवठेपिरानजवळ वारणा नदीत मृतदेह आढळला

अपहृत बांधकाम व्यावसायिकाचा खून; कवठेपिरानजवळ वारणा नदीत मृतदेह आढळला

सांगली : प्लॉट दाखविण्याचे आमिष दाखवून अज्ञातांनी अपहरण केलेले येथील बांधकाम व्यावसायिक माणिकराव विठ्ठल पाटील (वय 54, रा. इंद्रनील प्लाझा अपार्टमेंट, राममंदिर, सांगली) यांचा खून झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. त्यांचा मृतदेह कवठेपिरानजवळील वारणा नदीपात्राकडेला आढळून आला. येथील सिव्हिल रुग्णालयात मृतदेहाचे विच्छेदन करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान, पाटील यांचा खून का आणि कोणी केला असावा, हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. सांगली ग्रामीण, आष्टा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस यांच्याकडून स्वतंत्रपणे कसून तपास सुरू आहे. पाटील यांचा जमीन खरेदी करून त्यावर बांधकाम करण्याचा व्यवसाय आहे. दि. 10 ऑगस्टपासून त्यांच्या मोबाईलवर एक व्यक्ती फोन करीत होती. ही व्यक्ती तुंग परिसरात प्लॉट पाहण्यास येण्यासाठी आग्रह करीत होती. पाटील यांना वेळ नव्हता. त्यामुळे ते लगेच गेले नाहीत. परंतु, संबंधित व्यक्ती सातत्याने फोन करू लागल्याने पाटील यांनी दि. 13 ऑगस्ट रोजी येतो, असे सांगितले. पाटील यांना दिवसभर वेळ मिळाला नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने त्यादिवशी सायंकाळी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला. पाटील यांनी रात्री साडेआठ वाजता येतो, असे सांगितले. त्यानुसार ते कारने (क्र. एमएच 10 सीएन - 6864) तुंगला गेले.

मिणचे मळ्याजवळ भारत बेंझ शोरुमसमोर पाटील यांनी कार लावली. तेवढ्यात अपहरणकर्ते तिथे आले. पाटील यांना प्लॉट दाखवितो, असे सांगून त्यांच्या कारमध्ये बसले. तेथून त्यांना घेऊन निघून गेले. पाटील हे रात्री उशिरापर्यंत घरी आले नाहीत. मुलगा विक्रमसिंह यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. पण मोबाईल बंद लागत होता. रात्रभर त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळीही ते आले नाही. दि. 14 व 15 ऑगस्टपर्यंत पाटील यांची घरच्यांनी प्रतिक्षा केली. मात्र ते आलेच नाही. त्यामुळे विक्रमसिंह यांनी सोमवारी रात्री ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी तुंगमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. अपहरणकर्ता ज्या मोबाईल क्रमांकावरून फोन करीत होता, तो मोबाईल कवठेपिरान (ता. मिरज) येथील एकाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यक्तीकडे पोलिसांनी चौकशी केली. पण त्याने पंधरा दिवसापूर्वी मोबाईल पडला होता. तो सापडला नाही, असे सांगितले आहे.

दरम्यान कवठेपिरान जवळील वारणा नदीपात्राकडेला एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती गावच्या पोलिस पाटलांना आज सकाळी मिळाली. त्यांनी ही माहिती सांगली ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिस निरिक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह त्यांच्या पथकाने पाहणी केली. त्यावेळी हा मृतदेह माणिकराव पाटील यांचा असल्याचे उघड झाले. मृतदेहाचे येथील सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदन उशिरापर्यंत सुरु होते. दरम्यान लवकरच या घटनेचा छडा लावला जाईल, असे पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी सांगितले.

मृतदेह पाहण्यासाठी गर्दी

कवठेपिरान येथे नदीपात्रात मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाहण्यासाठी गावातील लोकांनी नदीकाठावर गर्दी केली होती. गावातून नदीपात्राकडे जाण्यासाठी चांगला रस्ताही नाही. चिखलातून जावे लागते. त्यामुळे माणिकराव यांचा मृतदेह नदीकडे कसा नेला असावा, याचा तपास पोलिस करीत आहेत.

पाठीमागे हात बांधलेले

माणिकराव यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांचे हात पाठीमागे दोरीने बांधलेले अढळून आले. हात बांधलेली दोरी ज्या पद्धतीची आहे, त्याच पद्धतीच्या दोरीचा तुकडा ज्या ठिकाणाहून अपहरण झाले, त्या ठिकाणी पोलिसांना मिळाला आहे. त्या शिवाय शरीरावर हल्ला केल्याची जखम दिसून आली नाही.

सीसीटीव्ही फुटेजचा कसून तपास

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासणी केली. यामध्ये पाटील हे मिणचे मळ्याजवळ कार लावून उभे होते. अपहरणकर्ते त्यांच्याजवळ गेले. थोडा वेळ त्यांच्याशी बोलून ते कारमध्ये बसून पाटील यांना घेऊन गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कार सांगलीच्या दिशेने गेल्याचे फुटेजच्या तपासणीतून दिसून येत आहे; पण कारचा क्रमांक दिसत नाही. या फुटेजचा तपास पोलिस कसून करीत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.