Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नामा गेल्यानंतरचे प्रश्‍न

 नामा गेल्यानंतरचे प्रश्‍न


आज नामदेव पण गेला. गेल्या काही महिन्यांपासून 40 ते 50 वयोगटातील आपले अगदी जवळचे दोस्त असे अचानक गेले. अगदी न चुकता व्यायाम करणारे, कामात व्यस्त असलेले, कोणतेही व्यसन नसणारे, शिस्तप्रीय असलेले, हसत खेळत वागणारे हे लोक असे अगदी अचानकच, एकाएकी का जात आहेत समजत नाही. आज नामदेवला दहन देतेवेळीही हाच सवाल आपण एकमेकांना विचारत होतो. पण आता याचं उत्तरही अतिशय गांभिर्यानं शोधलं पाहिजे असं वाटतं. 

चर्चेतून, बोलण्यातून जे मुद्दे येतात ते असे- 

1.

कोरोनाची लस आणि बुस्टर डोस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होतात आणि हार्ट अटॅक येतो. हे खरं आहे का? याबाबत गांभिर्यानं वैद्यकिय सल्ला घेतला पाहिजे.

2. आपण रोज न चुकता व्यायाम करतो, पण मेंदू शांत असतो का? रोज हजार किलोमिटर सायकलींग करायचं. फोटोबिटो काढून पोस्ट करायचे. कशासाठी? डोक्यात हजार सवालांची राख घेऊन जर नुसता शरीराचाच व्यायाम होत असेल तर त्याचा उपयोग होत असेल का? मग डोकं शांत रहाण्यासाठी काय केलं पाहिजे?..याबाबत विचार केला पाहिजे. सल्ला घेऊन तसे उपाय केले पाहिजेत. 

3.

  संसारात, नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायात हजार कटकटी आहेत आणि त्या आता वाढल्या आहेत. कुठंच कसलंच समाधान नाही, पण पोटासाठी सारं सहन करावं लागतं आहे. पण करायची म्हंटलं तरी यातून सुटका होणार आहे का? तर नाही. मग या कटकटींचं काय करायचं? हे टेन्शन कधी आणि कसं संपवायचं? यासाठी काही मार्ग आहेत का? ते बघीतले पाहिजेत.

4. काही माणसं बघीतली की डोक्याची शीर उठते. भयंकर राग येतो. पण परिस्थितीच अशी आहे की ती टाळता पण येत नाहीत. मग याचं काय करायचं? ही सारी नको असलेली माणसं असतानाही सुखानं राहता येईल का? त्यासाठी काय करावं?

5.

कर्ज आहे. हप्ते आहेत. मुलांच्या शिक्षणाचा प्रचंड खर्च आहे. त्यामानानं उत्पन्न नाही. आर्थिक परिस्थितीचं भयंकर टेन्शन आपल्या डोक्यावर आहे. यावर उपाय म्हणजे उत्पन्न वाढवणे. ते वाढवण्यासाठी रात्रंदिवस पळायचे का मग? की योग्य नियोजन करायचे? त्याचा विचार करायला पाहिजे.

6. अगोदरच बीपी आहे, शुगर आहे, त्यात कोरोना होऊन गेला आहे. धाप लागते. घाम येतो. अन्न घशात अडकतं. हात पाय कापतात. झोप लागत नाही. भुक लागत नाही. पित्त उसळून येतं. या सार्‍या काही अभिमानाच्या गोष्टी नाहीत. यावर उपाय काय? रोज उठून पाटीभर गोळ्या औषधं खायची का? (सदानंद कदम भेटले. त्यांनी नुसत्या आहार आणि व्यायामावर इन्सुलीन बंद करुन दाखवलं आहे). 

7.

मन:शांतीसाठी काय करायचं की नाही? खरं दुखणं तर तेच आहे. महत्वाचं म्हणजे औषधं खाऊन मन:शांती मिळत नाही. मग रोज तासभर जप केला. ध्यान केलं. शांत गाणी ऐकली. शांत लेक्चर ऐकलं. यामार्गानं मन शांत ठेवायचा प्रयत्न केला तर काय हरकत आहे? पण त्यासाठी वेळ काढावा  लागणार.

8. खायचं म्हणजे किती खायचं आणि काय काय खायचं हे एकदा ठरवायला पाहिजे. आठवड्यातून कितीदा मटण खायचं? किती ड्रिंक्स घ्यायचं? किती मावा खायचा? किती जागरणं करायची? आता हे सारं आपणाला पचतं का? हे पण एकदा बघायला पाहिजे. 

9.

कुजकापणा, कट कारस्थानं, कुरघोड्या कशासाठी? कुठंपर्यंत? कुणासाठी? ज्याच्याबध्दल हे सारं करायचं तो सुखीच आहे. त्याची प्रगती सुरुच आहे. मग आपण हे असं कुठंवर आणि का करायचं? यात आपल्याही डोक्याला ताप होत नाही का? स्वभाव बदलला तर बरेच सवाल सुटतील असं वाटतंय. 

10. व्हाटसप म्हणजे काही भावकी गावकी नाही. खुप चांगले संबंध केवळ व्हाटसपमुळे संपुष्टात आलेत. कितीतरी चांगले दोस्त फक्त व्हाटसपमुळं दुर गेलेत. एकाद्या पोस्टमुळं इगो दुखवतात. माणसं नाराज होतात. संबंध तुटतात. मग हे पाहिजेच कशाला? काही चांगलं असेल तर पोस्ट करा. फॉरवर्ड करायचा नाद बंद करा. माणसं महत्वाची का व्हाटसप? (हजारभर ग्रुपमध्ये थांबून काय मिळतं? ते वाचायला वेळ तरी मिळतो का? रोज हजार मेसेज, ते पण बिनकामाचे. करायचे का? आपल्याला आनंद, माहिती देणार्‍या अगदी मोजक्या ग्रुपमध्ये थांबा. बाकीच्यातून बाहेर पडा.)

11.

परिस्थिती अशी आहे की, काही तरी काम असल्याशिवाय मित्राची आठवणच येत नाही. नात्यात कमर्शिअलपणा आला आहे. मुलखाचा कोडगेपणा आला आहे. कधीतरी निवांत, बिनकामाचा फोन करा. एकमेकांची चौकशी करा. विचारपूस करा. काही अडचण आहे का? घाबरु नको. आपण बघू असा दिलासा द्या. हेच खरं औषध आहे..आणि तेच दुर्मीळ आहे.

नामाला दहन देऊन आल्यावर हे सारं मनात दाटून आलं म्हणून लिहीलं. 

विचार करा. 

नाहीतर आजकाल कुणाचाच भरवसा राहिला नाही. आणखी उशीर  व्हायला नको.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.