Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"परिणाम भोगावे लागतील, आम्ही आता सगळे काही संपवून टाकू"; समीर वानखेडेंना धमकी

 "परिणाम भोगावे लागतील, आम्ही आता सगळे काही संपवून टाकू"; समीर वानखेडेंना धमकी


मुंबई: क्रुझ ड्रग प्रकरणी  शाहरूख खानचा  मुलगा आर्यन खानला अटक केल्याप्रकरणी चांगलेच चर्चेत आलेल्या अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे  यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी  जात पडताळणी समितीकडे समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. मात्र, जातपडताळणी समितीकडून समीर वानखेडे यांनी क्लीन चिट देण्यात दिली आहे. त्यानंतर, आता समीर वानखेडे आक्रमक झाले असून नवाब मलिक यांच्याविरुद्ध त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. यानंतर आता समीर वानखेडे यांना धमकी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना ट्वीटरवरून धमकी देण्यात आली आहे. याबाबत वानखेडे यांनी मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे. अमन नावाच्या ट्विटवर हँडलवरून धमकी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ट्विटवरून संदेश पाठवून धमकी देण्यात आली. वानखेडे यांनी याबाबत पोलिसांना कळवले असून चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

आम्ही आता सगळे काही संपवून टाकू

तुम्ही जे केले त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आम्ही आता सगळे काही संपवून टाकू, अशा शब्दांत समीर वानखेडे यांना धमकवण्यात आले आहे. तत्पूर्वी, समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी तक्रारदार समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. नुकतीच जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून वानखेडे यांना दिलासा मिळाला होता. याप्रकरणी आता बदनामी करणे व अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा करण्यात आला असून याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी करत आहे.

समितीने ९१ पानी निकालपत्रात केले स्पष्ट

समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचे कुठेही सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे हिंदू महार हे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. तसेच यासंदर्भात कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळे समितीने ही तक्रार फेटाळून लावली आहे. समितीने ९१ पानी निकालपत्रात स्पष्ट केले आहे. या निकालानंतर वानखेडे यांनी सत्यमेव जयते, असे ट्विट केले. हा समीर वानखेडे यांच्यासाठी खूप मोठा दिलासा मानला जात आहे.

दरम्यान, आर्यन खानच्या अटकेनंतर नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. इतकेच नाही, तर समीर वानखेडे यांनी जात बदलल्याचा दावा करत नवाब मलिक यांच्यासह चौघांनी जात पडताळणी समितीकडे समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. प्रशासकीय सेवेतील नोकरी मिळवताना समीर वानखेडे यांनी आपली खोटी जात सांगितल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.