Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्धव ठाकरेंना धक्का! चंद्रकांत खैरेंना कंटाळून शिवसेना नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

 उद्धव ठाकरेंना धक्का! चंद्रकांत खैरेंना कंटाळून शिवसेना नेत्याचा शिंदे गटात प्रवेश


मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडल्याचं चित्र आहे. विधानसभेचे ४० आमदार आणि लोकसभेच्या १२ खासदारांनी याआधीच शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

तर शिवसेनेतील पदाधिकारीही शिंदे गटात सहभागी होत आहे. शिंदे यांच्या बंडाचा सर्वाधिक फटका मराठवाड्यात बसला आहे. याठिकाणी बहुतांश शिवसेना आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आता शिवसेनेचे लातूरचे माजी जिल्हाप्रमुख बळवंत जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.

उद्धव ठाकरेंबद्दल आपल्याला आदर आहे. त्यांच्याबाबत आदर कमी झाला नसून औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या कारभाराला कंटाळून मी शिंदे गटात सहभागी होत असल्याचं बळवंत जाधव यांनी सांगितले. "खैरे यांच्या नेतृत्वावर मी नाराज आहे. त्यांनी लातूरमध्ये शिवसेनेला कमी करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंबद्दल माझे प्रेम आणि आदर कायम राहील. शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पावले उचलली आहेत असं जाधव यांचं म्हणणं आहे. बळवंत जाधव हे माजी राज्यमंत्री दिवाकर रावते यांचे निकटवर्तीय मानले जाते.

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करू नये. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला नेहमी आघाडीनं नाकारलं आहे असं जाधव यांनी म्हटलं. बळवंत जाधव हे २००० ते २००३ पर्यंत लातूर जिल्हाप्रमुख होते. त्याचसोबत २०१६ ते २०१८ पर्यंत जिल्हा समन्वयक म्हणूनही बळवंत जाधव यांनी जबाबदारी सांभाळली. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी पक्षाचे नांदेड जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांची हकालपट्टी केली. मागील जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं. ज्यामुळे राज्यातील ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागलं.

त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत हातमिळवणी करत राज्यात नवीन सरकार स्थापन केले. ३० जून रोजी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर माजी मंत्री आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी राज्यभर निष्ठा यात्रा काढली. यावेळी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जात त्याठिकाणी शक्तीप्रदर्शन केले. हे सरकार बेकायदेशीर असून जास्त काळ टिकणार नाही. शिंदे सरकार लवकरच कोसळणार असा दावा आदित्यकडून सातत्याने केला जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.