Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंमली पदार्थांचे अमेरिका-नागपूर-मुंबई जाळे; एनसीबीच्या कारवाईत धक्कादायक माहिती समोर

अंमली पदार्थांचे अमेरिका-नागपूर-मुंबई जाळे; एनसीबीच्या कारवाईत धक्कादायक माहिती समोर


मुंबई : आत्तापर्यंत समुद्रमार्गे, परदेशातून हवाईमार्गे किंवा दक्षिणेतून मुंबईत अमली पदार्थ येत असल्याचे समोर आले आहे. पण आता अमली पदार्थांचे नागपूर व मुंबई असे जाळे असल्याचे नार्कोटिक्स कण्ट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) कारवाईत समोर आले आहे. एनसीबी मुंबईने अलीकडेच ५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. त्यात तीन जणांना अटक झाली. दोन वाहनांसह ४.९० किलो मेथाक्वॉलोन, ८७० ग्रॅम उच्च दर्जाची हायड्रोपोनिक विड व ८८ किलो चांगल्या दर्जाच्या गांजा जप्त करण्यात आला. 

एनसीबी मुंबईचे प्रादेशिक संचालक अमित घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईचे जाळे अमेरिका-नागपूर-मुंबई असल्याचे समोर आले आहे. पहिल्या कारवाईत मुंबईतील टपाल कार्यालयातून कुरिअर पार्सलमधून ८७० ग्रॅम हायड्रोपोनिक तण जप्त करण्यात आले होते. हे पार्सल अमेरिकेतून नागपूर येथील एका दलालाकडे पाठवण्यात आले होते. दुसऱ्या कारवाईत मुंबईतील एका खासगी कुरिअर पार्सलमधून ४.९० किलो मेथाक्वॉलोन जप्त करण्यात आले. हे पार्सल न्यूझीलंडला पाठविले जाणार होते. पण त्याचे बुकिंग नागपूर येथून झाले होते. दोन्ही कुरिअर पार्सलबाबत नागपूर हाच धागा असल्याचे आढळले. दोन्ही प्रकरणांच्या तपासासाठी तातडीने एक पथक नागपूरला पाठविण्यात आले. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या टोळीची ओळख पटविण्यासाठी विविध पैलूंचे विश्लेषण केले जात आहे.

मुंबईतील स्थानिक दलालांचा सहभाग

कुरिअर प्रकरणांचा एक भाग म्हणून एनसीबीने कर्जत येथे महामार्गावर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला दोनच दिवसांपूर्वी पकडले. संबंधित वाहनाची झडती घेतली असता वाहनाच्या आत तयार केलेल्या खोट्या पोत्यांमधून एकूण ८८ किलो उच्च प्रतीचा गांजा जप्त करण्यात आला. संशयिताची जागेवरच चौकशी केली असता महामार्गावरील ढाब्यावरून आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले. हा साठा आंध्र प्रदेशातून आणला गेला होता आणि तो मुंबई आणि उपनगर भागातील स्थानिक दलालांना वितरित करण्यासाठी होता, असे सूत्रांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.