Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अनाथ बालकांना कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देवून सक्षम करण्यावर भर द्या - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

अनाथ बालकांना कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देवून सक्षम करण्यावर भर द्या - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी


सांगली, दि. 26,  :  अनाथ बालकांचा सांभाळ करून त्यांना पुढील आयुष्यात सक्षमपणे जगता यावे यासाठी त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठीच शैक्षणिक काळात अशा अनाथ बालकांना कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देवून सक्षम करण्यावर अधिकचा भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जिल्हा महिला सल्लागार, बाल संरक्षण हक्क समिती, बाल कल्याण समिती आदि बैठका जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या. यावेळी ते बोलत होते. यावेळी विधी व न्याय प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती प्रविण नरडेले, महापालिका उपायुक्त राहूल रोकडे, कौशल्य विकास चे सहायक आयुक्त जमीर करीम, महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

महिला व बाल विकास विभाग तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी अनाथ बालकांच्या आरोग्य तपासणी, त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा या वेळेवर पुरविण्यात याव्यात. बालसंरक्षण गृहात असणाऱ्या बालकांची योग्य प्रकारे काळजी घ्यावी असे निर्देशित करून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी  म्हणाले, ज्या बालगृहांमध्ये एड्सग्रस्त मुलांचे वास्तव्य आहे अशा संस्थांची नावे बदलण्यात यावीत. यामुळे अशा बालकांच्या प्रती समाजातील भेदभावना कमी होण्यास मदत होईल. एड्सग्रस्त बालकांची कोणतीही चूक नसताना ते या रोगाने ग्रस्त असतात अशा बालकांचे मनोधैर्य वाढविण्यावर भर द्यावा. तसेच ही बालके समाजात सक्षमपणे उभी राहण्यासाठी त्यांना उच्च शिक्षीत कौशल्यपूर्ण शिक्षणाने प्रशिक्षीत करून त्यांचे योग्य पध्दतीने पुनर्वसन करण्यावर भर देण्यात यावा. त्याचबरोबर अनाथ बालकांना दत्तक घेण्यासाठी समाजामध्ये प्रबोधन करण्यात यावे. समाजात अनेक ठिकाणी लहान बालके भीक मागताना दिसतात तरी याचाही शोध घेण्यात यावा. भीक मागण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या यंत्रणांची चौकशी करण्यात यावी. जर अशा बालकांच्या मागे त्यांचे कुटुंबीय पालक असतील तर त्यांचेही समुपदेशन करण्यात येवून यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच अशा कुटुंबांना, पालकांना, बालकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठीही प्रयत्न करावेत.

समाजामध्ये बालविवाह होण्याच्या घटना घडत आहेत यावर पूर्णपणे नियंत्रण करण्यासाठी प्रचार व प्रसिध्दी मोहिम राबवावी. यासाठी बालसंरक्षण समित्यांनी प्रभावीपणे काम करावे, असे आदेशीत करून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, 1098  या क्रमांकावर  संपर्क साधण्यासाठी सबंधित यंत्रणांची याचा अधिकाधिक प्रसार करावा. जिल्ह्यामध्ये निर्भया पथकांची संपूर्ण माहिती जनतेला समजावी यासाठी दर्शनीय भागात निर्भया पथकांची माहिती लावण्यात यावी. निर्भया पथकाची कामकाज पध्दती याबाबत माहिती व्हावी यासाठी शाळा, हायस्कूल, कॉलेजमध्ये कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे. बालकांविषयी येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचे योग्य पध्दतीने निवारण करण्यासाठी बालकल्याण समितीने प्रभावीपणे काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी महिला व बालकांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती सादर केली. तसेच जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या विविध संस्थांचा यावेळी सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.