Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जयंत पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम!

जयंत पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम! 


विश्वासू सहकारी राष्ट्रवादीत; राणा दाम्पत्याला मोठा धक्का

एकनाथ शिंदे  यांनी शिवसेनेत केलेल्या मोठ्या बंडखोरीनंतर सत्तासंघर्ष शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे  यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, तत्पूर्वी हनुमान चालिसावरुन महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला आव्हान देणाऱ्या अपक्ष आमदार रवी राणा  आणि खासदार नवनीत राणा  यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा धक्का दिला आहे. राणा दाम्पत्याला विश्वासू सहकारी गळाला लावून करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

युवा स्वाभिमान पक्षाच्या नगरसेविका सपना ठाकूर यांनी राणा दाम्पत्याला धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जयंत पाटील यांनी सपना ठाकूर यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले. संघटनात्मक आढावा दौऱ्याच्या निमित्ताने पाटील राज्यातील विभाग पिंजून काढत आहेत. अमरावतीत राष्ट्रवादीची फारशी ताकद नसल्याने तिथे ताकद वाढवणे हे आपल्यासमोरचे आव्हान असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल

अमरावती शहरात सर्व काही असतानाही येथे राष्ट्रवादीचे नगरसेवक कमी निवडून येतात याबाबत मला प्रचंड खंत वाटते. मात्र शहराची सध्याची परिस्थिती पाहता पुढच्या काळात या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. आपल्या जिल्ह्याला विचारांचा मोठा वारसा आहे, या जिल्ह्याने आपल्या विवेकाचा वापर करून अनेकदा चांगल्या लोकांना संधी दिली आहे. येणाऱ्या काळातही काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण वर आणण्याचा प्रयत्न करू, असे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान, राजकारणात वेळ फार महत्त्वाचा, लोक राजकारणात आयुष्य घालवतात त्यामुळे वेळेचा उपयोग करून पक्षाच्या आणि आपल्या प्रगतीचा विचार आपण करायला हवा. लोकांना विषय समजून सांगा तरच लोकांचे प्रबोधन होईल आणि एक जन आंदोलन उभे राहील. येणाऱ्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकायला हवा यासाठी प्रयत्न करा. आपल्यात अचूक नियोजन पाहिजे, एकसंधपणा पाहिजे तर आपल्याला कोणीही पराजित करू शकत नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.