शरद पवार यांची नात देवयानी पवार जागतिक स्तरावर करणार देशाचे प्रतिनिधित्व..
नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नात देवयानी पवार या आता जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. देवयानी या वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (WEF) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'ग्लोबल शेपर्स अॅन्युअल समिट'मध्ये ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. याआधी शिवसेना युवासेना नेते आदित्य ठाकरे 'वर्ल्ड इकोनॉमिक फोरम'द्वारा आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते.
देवयानी 'ग्लोबल शेपर्स कम्युनिटी'च्या बारामतीतील केंद्राची प्रमुख (क्युरेटर) म्हणून काम पाहतात. सप्टेंबर महिन्यात युरोपातील जिनीव्हा येथे पार पडणाऱ्या समिटमध्ये त्या सहभागी होणार आहेत. 'ग्लोबल शेपर्स कम्युनिटी' ही ग्रामीण भागात काम करणारी एक समाजसेवी संस्था आहे. या कम्युनिटीच्या बारामतीतील केंद्रातून मानसिक आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, हवामान बदल आणि जैवविविधता संरक्षण यांसारख्या क्षेत्रात काम केले गेले आहे.
"३० वर्षाखालील युवा नेत्यांच्या मंचावर ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी मोठी संधी आणि अभिमानास्पद बाब आहे. ग्रामीण जनतेसोबत काम करताना आलेले अनुभव मी मांडणार आहे", असं देवयानी म्हणाल्या. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे. बारामती हबच्या माध्यमातून युवा वर्ग एकत्र येऊन शाश्वत ग्रामीण भागासाठी काम करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
देवयानी पवार या शरद पवार यांचे पुतणे रणजीत पवार आणि शुभांगी पवार यांच्या कन्या आहेत. रणजीत पवार हे शरद पवारांचे सर्वात ज्येष्ठ बंधू अप्पासाहेब पवार यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत. देवयानी यांनी वारीच्या काळात महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेतला होता. महिला वारकऱ्यांसाठी सॅनिटरी पॅडची व्यवस्था करुन दिल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. आता युरोपात भारतातील ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणार असल्यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.