Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी


सांगली, दि. १२,  :  राष्ट्रध्वजाचा  मान  राखणे  हे  प्रत्येक  नागरिकाचे  कर्तव्य  असून राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी  यांनी  प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन केले आहे.

राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या  उचित  वापराबाबत  तरतूद  केलेली  आहे.  केंद्रीय  गृह  मंत्रालयाने  दिलेल्या  निर्देशानुसार  राष्ट्रध्वजाकरिता  प्लॅस्टिकच्या  वापरास  मान्यता  नाही.  कार्यक्रमानंतर  असे  कागदी  व  प्लॅस्टीकचे  राष्ट्रध्वज  संबंधिताकडून  इतस्तत: टाकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचाअवमान होतो. या अनुषंगाने  सर्व  आस्थापनांना  आवश्यक  त्या  उपाययोजना करून  दक्षता  घेण्याचे  आवाहन  ‍जिल्हा  प्रशासनाने  केले  आहे.  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा अभियान 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येत आहे. राष्ट्रध्वजाचा  अवमान  होणार  नाही  यासाठी  जनतेने  देखील  आवश्यक  काळजी  सर्वोतोपरी घ्यावी, असे आवाहनही  जिल्हाधिकारी  डॉ.  राजा  दयानिधी  यांनी  केले आहे.

राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा. जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिला आहे.

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी. ध्वज हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत / पॉलिस्टर / लोकर / सिल्क / खादीपासून बनविलेल्या  कपड्याचे असावे. विभाग / कार्यालय प्रमुख/नागरीक यांनी आपले कार्यालयावर/घरावर  दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ध्वज फडकवावा. ध्वज उच्च स्थानी आणि स्पष्टपणे दिसेल अशा रितीने लावावा.  दिनांक १३ ऑगस्ट  ते १५ ऑगस्ट २०२२ रोजी ध्वज सुर्योदयावेळी फडकवावा व सुर्यास्तावेळी उतरवावा याबाबत कार्यालयांना ध्वज संहिता पाळावी लागेल.  घरावर फडकविण्यात येणारा तिरंगा दररोज संध्याकाळी खाली उतरवयाची आवश्यकता नाही. ध्वज ज्या काठीवर फडकविण्यात येतो ती काठी दणकट व सरळ असावी. ध्वज लावताना केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी. ध्वज उतरविल्यानंतर त्यांची व्यवस्थित घडी घालून तो कपाटात ठेवावा.

प्ला‍स्टिकच्या ध्वजाचा वापर करु नये. ध्वज फाटलेला अथवा चुरगळलेला लावता कामा नये. ध्वज ज्या काठीवर फडकत असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार घालु नयेत.इतर कोणताही ध्वज राष्ट्रीय ध्वजापेक्षा उंच नसावा व राष्ट्रीय ध्वजाच्या लगत नसावा. ध्वजाचा स्पर्श जमीनीस होऊ देऊ नये अथवा तो पाण्यावरुन फरफटत नेऊ नये. ध्वज फाटेल अशा पध्दतीने फडकवू नये अथवा बांधू नये. ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.